अहिल्यानगर: जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांची संख्या १३ हजार ४६९ आढळली आहे. दर हजारामागे बाधितांचे प्रमाण ३ टक्के आहे. त्यामुळे राज्यातील ज्या २२ जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीवरील नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून डिसेंबर २०२६ अखेर प्रत्येक बाधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्या उपचारांमध्ये सातत्य ठेवून बाधिताला सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. जिल्ह्यात १३ हजार ४६९ बाधितांवर उपचार सुरू असले तरी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या माहितीनुसार जिल्ह्यातील संभाव्य बाधितांची संख्या १४ हजार ७२० असावी. त्यामुळे उर्वरित बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. या संदर्भात पुणे येथे कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.

जिल्ह्यात सन २००२ मध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढलेले होते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमी होत गेले. मात्र सन २०२० पासून ते आत्तापर्यंत बाधितांचे प्रमाण ०.३ टक्क्यांवर स्थिरावले आहे. हे प्रमाण कमी करण्याच्या हेतूनेही मोहीम राबवली जात आहे.राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या सूचनेनुसार किमान ९५ टक्के बाधितांची तपासणी होणे आवश्यक आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात हे प्रमाण ९२ टक्के आहे.

याचबरोबर शोध लागलेल्या बाधितांवर उपचाराचे प्रमाण ९४ टक्के आहे तसेच बाधितांच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण (व्हायरल लोड) कमी करण्यासाठी दर सहा महिन्यांनी तपासणी होण्याचे प्रमाण ९९ टक्के हवे आहे ते जिल्ह्यात ९७ टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.यासाठी आरोग्य विभागाकडून आशा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत जनजागृतीच्या मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.

त्याअंतर्गत धोकादायक वर्तन असणाऱ्या व्यक्तींचा (हाय रिस्क ग्रुप) शोध घेतला जाणार आहे. त्यामध्ये शरीरविक्रय करणाऱ्या महिला, मालमोटर चालक, कैदी, समलैंगिक व्यक्ती, इंजेक्शनमधून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा शोध घेणे, गरोदर मातांकडून बाळाकडे होणारे संक्रमण थांबवणे याचा समावेश आहे. स्वयंसेवी संस्थांचीही मोहीमेत मदत घेतली जाणार आहे.

शोध, उपचार व नियंत्रण

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्यांना गुणवत्तापूर्ण जीवनमान जगण्यासाठी जनजागृती करणे तसेच नवीन प्रसार थांबवण्यासाठी प्रबोधन करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत.-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद.

उपचारात सातत्य हवे

एचआयव्ही बाधितांवर मोफत उपचार केले जातात. त्याबद्दल गोपनीयताही पाळली जाते तसेच त्यांच्या उपचारात सातत्य ठेवून ‘व्हायरल लोड’ कमी करून त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. -शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम आधिकारी, एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग.