अहिल्यानगर: घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅस टाक्यांची काळ्याबाजारात विक्री करणारे, शहरात बेकायदा रिफिलिंग सेंटर चालवणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीतील इतर दोघे पसार झाले. पोलिसांनी तब्बल घरगुती व व्यवसायिक वापराच्या १३३ टाक्यांसह २१ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या कारवाईची माहिती दिली. कल्ला रघुराज सिंग (वय २४, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव, अहिल्यानगर) व गौरव राजेंद्र आढाव (वय ३४, रा. पिंपळगाव माळवी, अहिल्यानगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे अवैध रिफिलिंग सेंटर चालवणारा किरण संतोष गलांडे ( रा. दक्षतानगर, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) व त्याला अवैधरित्या गॅस टाक्यातून पुरवणारा नितीन कदम ( रा. पाइपलाइन रस्ता, अहिल्यानगर) हे दोघे पसार झाले आहेत.

या कारवाईमध्ये भारत गॅस कंपनीच्या ५६ घरगुती, ४६ व्यावसायिक वापराच्या भरलेल्या व घरगुती वापराच्या २ रिकाम्या टाक्या, हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनीच्या २३ घरगुती, ३ व्यावसायिक भरलेल्या व ३ व्यावसायिक रिकाम्या, दोन इलेक्ट्रिक मशीन, इलेक्ट्रिक वजन काटे, छोटा टेम्पो, एक बोलेरो पिकअप व्हॅन, ओमनी मोटर, गॅस टाकी सील बसवण्यासाठी हिट गन मशीन व ३० गॅस टोपण, प्लास्टिक लेबल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना किरण गलांडे हा दक्षतानगर भागात अवैध गॅस रिफिलिंग सेंटर चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल कोतकर यांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

गलांडे याच्या मालकीच्या गाळ्याच्या पाठीमागे, मोकळ्या जागेत घरगुती वापराच्या गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग केले जात असल्याचे आढळले. तेथे कल्ला रघुराज सिंग व गौरव आढाव हे दोघे घरगुती गॅस टाकीस इलेक्ट्रिक मोटर जोडून वजन काट्यावर ठेवून रिफिलिंग करताना आढळले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आखाती युद्ध सुरू असताना स्वयंपाकाच्या गॅस टाक्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या काळातही पोलिसांच्या पथकांनी छापे टाकत अवैध गॅस रिफिलिंग सेंटर उघडकीस आणले होते. आता स्वयंपाकाच्या गॅस टाक्यांचा पुरवठा बऱ्याचशा प्रमाणात सुरळीत झाला आहे. त्यानंतर पुन्हा गॅस टाक्यांचा काळाबाजार सुरू झाला आहे. घरगुती वापराच्या गॅस टाक्यातून व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरून त्याची व्यावसायिकांना विक्री केली जाते. शहरात रस्त्यांवर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणारे अनेकजण या टाक्यांचा वापर करतात.