अहिल्यानगर : युद्ध परिस्थितीमुळे असुरक्षित वातावरणात आखातातील बहारीन देशामध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर शहरातील जठार कुटुंबाला माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पारपत्र नुतणीकरणासह तो बहारिनमध्ये उपलब्ध करण्यास केलेल्या मदतीमुळे भारतात परतणे शक्य झाले. सत्यजित जठार व त्यांचे कुटुंब रविवारी (दि. २२) अहिल्यानगरमध्ये सुखरूप परतले.

शहरातील सावेडी उपनगरात राहणारे सत्यजित जठार बहारिनमध्ये खासगी नोकरीनिमित्त दोन वर्षांपूर्वी गेले. त्यांच्या समवेत पत्नी व दोन लहान मुले होती. अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर बहारिनमध्येही ड्रोन हल्ले व क्षेपणास्त्र हल्ले होऊ लागले. सतत वाजणाऱ्या सायरनमुळे भीतीचे वातावरण झाले, तपासण्या सुरू झाल्या. त्यामुळे तेथील वातावरण असुरक्षित बनले होते. बहारीन देशाची वाहतूक सेवाही बंद करण्यात आली होती.

त्यामुळे जठार कुटुंबीयांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मात्र सत्यजित यांचा मुलगा साहस जठार याच्या पारपत्राचे नूतनीकरण झाले नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला. या कुटुंबाला बहारिनमध्येच थांबावे लागले. त्यांच्यासमोर असुरक्षित वातावरणाची अडचण निर्माण झाली. सत्यजित जठार यांनी उपमहापौर धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी ही बाब माजी खासदार सुजय विखे यांच्या निदर्शनास आणून दिली.

सुजय विखे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित पारपत्र दिल्लीत नुतणीकरणसाठी मदत करून तो बहारिनमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली.

नूतनीकरण केलेले पारपत्र जठार कुटुंबीयांना १४ मार्चला मिळणे अपेक्षित होते. तो न मिळाल्याने त्यांना एक आठवडा बहारिनमध्येच अडकून पडावे लागले. अखेर १९ मार्चला मुलाचा नूतनीकरण झालेले पारपत्र मिळाल्यानंतर ते रविवारी भारतात परतले व अहिल्यानगरमध्ये पोहोचले. माजी खासदार विखे यांनी केलेल्या मदतीबद्दलच्या जठार कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणची हवाई वाहतूक, सुरक्षा प्रतिबंध व प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा कठीण परिस्थितीत जठार कुटुंब विखे यांनी केलेल्या मदतीमुळे मायदेशी परतले. सुजय विखे यांनी केलेल्या मदतीबद्दल अहिल्यानगरमध्ये परतलेल्या सत्यजित जठार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. जठार सध्या सुट्टीवर परतले आहेत, परिस्थिती सुधारल्यानंतर आपण परत बहरीनमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.