अहिल्यानगर: येथील काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी व नर्सिंग महाविद्यालय १३४ किमी. अंतरावरील भिगवन (पुणे) येथे स्थलांतरित करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे सुमारे ६५० विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. भिगवणऐवजी ही महाविद्यालये नगर शहराच्या १० ते १५ किमी.च्या परिघातच स्थलांतरित करावीत व आमच्या शैक्षणिक भविष्याचे रक्षण करावे, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दाद मागितली आहे.
विद्यार्थ्यांचा हा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
संस्थेची ही दोन्ही महाविद्यालय सध्या चास (ता. अहिल्यानगर) येथे आहेत. महाविद्यालय १३४ किमी. दूरवर असलेल्या भिगवण येथे स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्थापनाने विद्यापीठाकडे चुकीचा प्रस्ताव दाखल केला आहे व त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात आहे. अचानक घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे विद्यार्थी, प्रॅक्टिस करणारे इंटर्न व संशोधन करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अहिल्यानगर शहर केंद्र गृहीत धरून येथील क्लिनिकल ट्रेनिंग व सोयी पाहून महाविद्यालयात प्रवेश घेतला. वसतिगृह, अनामत रक्कम, खानावळी यासाठी पैसे भरलेले आहेत. परंतु व्यवस्थापन स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी १३४ किमी दूर ग्रामीण भागात महाविद्यालय नेले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कायदेशीर वादातून संस्थेची मूळ इमारत गेल्यावर्षी पाडण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापनाने कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था न करता विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान केले आहे. व्यवस्थापनाने महाविद्यालय नगर शहरातच ठेवण्याची जबाबदारी स्वतः न घेता विद्यार्थ्यांवर दबाव आणला आहे व ‘ग्राहक’ शोधून देण्याची अवाजवी मागणी केल्याने विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करून नगरमधील नामांकित विखे पाटील संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे.
शहरातच स्थानिक पर्याय उपलब्ध असताना व्यवस्थापन दूरवरील भिगवन येथे जाण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे भिगवणचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
विखे फाउंडेशनशी चर्चा
काकासाहेब म्हस्के फाउंडेशनचे होमिओपॅथी व नर्सिंग ही दोन्ही महाविद्यालये भिगवणला स्थलांतरित करण्याचा निर्णय संस्थेने स्थगित केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार महाविद्यालये नगर शहराजवळच स्थलांतरित करण्यासाठी विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची उद्या, शनिवारी चर्चा होणार आहे. त्यासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ. अभिजीत म्हस्के, डॉ. दीप्ती ठाकरे व डॉ. विक्रम म्हस्के उपस्थित राहणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांना प्राचार्यांमार्फत कळवलेला आहे. विखे फाउंडेशनशी गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्याला उद्या अंतिम स्वरूप येण्याची शक्यता आहे. विश्वस्तांच्या परवानगीनेच आपण ही माहिती देत आहोत. –आकाश बनसोडे, मुख्य हिशोबनीस, काकासाहेब म्हस्के फाउंडेशन
