अहिल्यानगर: पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सहभागी शेतकरी संख्या आणि संरक्षित रक्कम या दोन्हीत मोठी वाढ झाली आहे. यंदा खरीप पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७२ कोटींचे पीक विमा संरक्षण मिळाले आहे. पावसात मोठा खंड पडल्याने यंदा खरिपातील पिके सुकून गेल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांसाठी विमा योजना फायदेशीर ठरणार आहे.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पीक विमा संरक्षण घेतल्याने शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळेल. यंदा पावसात पडलेला खंड, तसेच पिकांवर कीड-रोग मोठ्या प्रमाणावर आहे. या विमा छत्रामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भरपाईचा आधार मिळेल.

गेल्या वर्षी सन २०२५ मधील खरीपात जिल्ह्यातील २ लाख २४ हजार १४५ शेतकर्‍यांनी पिक विमा उतरवला. एकूण ४ लाख ५१ हजार १४९ जणांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते. यातून २ लाख ३८ हजार ८७२ हेक्टर संरक्षित झाले होते तसेच एकूण १२३६.२७ कोटी रूपयांचे विमा संरक्षण शेतकर्‍यांना मिळाले होते.

त्यानंतर हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या पिकांच्या नुकसानीपासून दिलासा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या प्रमाणावर पीक विम्याकडे वळल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२६ च्या खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या संख्येत ३५ हजार १४७ ची वाढ झाली. एकूण २ लाख ५९ हजार २९२ शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरवला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या नुकसानीच्या वेळी शेतकर्‍यांना १४७२.१४ कोटींचे वीमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. यामध्ये २ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली.

जिल्ह्यातील दुष्काळी पारनेर, जामखेड आणि अहिल्यानगर या तालुक्यांमध्ये शेतकर्‍यांची संख्या आणि विम्याचे संरक्षण मूल्य यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्यामळे यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना पीक विम्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांवरील विम्याच्या हप्त्याचा आर्थिक भार कमी झाला असून, कमी खर्चात १४७२ कोटींची जोखीम विमा कंपनीकडे वर्ग झाली आहे.

सोयाबीनसाठी ८८० कोटी

शेतकरी यंदा मोठ्या संख्येने सोयाबीन उत्पादनाकडे वळला होता. सोयाबीन उत्पादकांनी पीक विम्यासाठी २ लाख ३३ हजार ६३७ अर्ज केले. त्यासाठी ८८० कोटींचे विमा संरक्षण घेतलेले आहे. त्यापाठोपाठ कापूस उत्पादकांनी ६५ हजार ७३३ अर्ज केले. २३२ कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे. तुरीसाठी ५१ हजार ८१७ अर्ज दाखल झाले. त्यांना १२४ कोटींचे विमा संरक्षण मिळणार आहे.