अहिल्यानगर: जिल्ह्यात जुन ते सप्टेंंबर दरम्यान ३४ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याने १६१० गावांमधील १२ लाख १५ हजार शेतकर्‍यांचे ९ लाख ६२ हजार ११६ हेक्टर क्षेत्रावर सर्वच पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडे १३६५ कोटी १४ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज, गुरुवारी दिली.

जिल्हा माहिती कार्यालया आयोजित ’माध्यम संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी बोलत होते. कृषी विभागाची माहिती देतांना दुष्काळ निवारण व कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती विषद केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे उपस्थित होते. अधिक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळ यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या दरम्यान ४४८.१० मिमी सरासरी पर्जन्यमान अपेक्षित असते.

त्यापैकी २९७.९० मिमी पाऊस प्रत्यक्षात झाला. जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार शासनाने १४ तालुक्यामध्ये ट्रिगर १ व २ लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १६१० गावांमधील १२ लाख १५ हजार शेतकर्‍यांचे तब्बल ९ लाख ६२ हजार ११६ हेक्टर क्षेत्रावर पंचानामे झाले आहेत. त्यात जिरायत पिक ३ लाख ५४ हजार १८५ हेक्टर, बागायती पीक ५ लाख ८२ हजार ४३३ हेक्टर, फळपिके ५५ हजार ४९६ हेक्टरचा समावेश आहे.

शासनाचे निकष व पंचनाम्यानुसार नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १३६५ कोटी १४ लाख रुपये रक्कमेची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीक विमा संरक्षित रक्कम देखील शेतकर्‍यांना उपलब्ध होण्यादृष्टीने पिक विमा व पिक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत. त्याचाही शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. ४ लाख ९५ हजार ८०६ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे १४७१ कोटी रुपये पिक विमा संरक्षित रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

सध्या सोयाबीनचे १०० टक्के पीक कापणी प्रयोग झाले आहेत तर बाजरीचे ९८ टक्के व मका पिकाचे ८४ टक्के कापणी प्रयोग झाले आहेत. उर्वरित पिकांचे कापणी प्रयोग महसुल, कृषी, ग्रामविकास विभागामार्फत करण्यात येत असल्याचे सुधाकर बोराळे यांनी सांगितले.चारा पिकांसाठी रब्बी ज्वारीचे नियोजन करण्यात येत आहे. २१ हजार २० कीटचे शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्यात येत आहे. एक कीटमध्ये ४ किलो ज्वारी असून ती एक एकरसाठी वापरता येते. त्यानुसार २१ हजार एकरसाठी ज्वारीचे नियोजन करण्यात आले असून, त्यापासून ज्वारी व कडबा उपलब्ध होणार आहे.

पाच हजारांची मदत ५.५६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ११ लाख ७८ हजार ५५५ शेतकरी पात्र आहेत. त्यातील ५ लाख ५६ हजार २२५ शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांप्रमाणे २७८ कोटी ११ लाख रुपये खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी रक्कम देण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी आशिया यांनी सांगितले.