अहिल्यानगर: जिल्ह्यात पावसाने ताण दिल्याने खरिपातील मका, सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला असून या पिकांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर या भागात सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत निम्माच पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात कृष्णाष्टमीच्या मुहूर्तावर ज्वारीची पेरणी सुरू केली जाते. कांदा, हरभरा, ज्वारी या पिकांकडे शेतकरी वळतील. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाकडे लक्ष लागलेले आहे. विशेषत: दक्षिण भागात अनेकवेळा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला एल निनोच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात होती. मात्र जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली, धरणांच्या पाणलोटात चांगला पाऊस झाला, त्यामुळे धरणे भरली, ओसंडून वाहू लागली. मात्र झालेला पाऊस जिल्ह्यात असमान स्वरूपाचा आहे. काही मोजक्या तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली मात्र अनेक भागात कमी पाऊस झालेला आहे. याशिवाय पावसामध्ये खंडही पडलेला आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एकूण ७ लाख ९ हजार २७१ हेक्टर (९९ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. अकोल्यात पावसाने सरासरी ओलांडली मात्र तेथील भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असले तरी पावसाची नितांत आवश्यकता आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी पिकेही वाढीच्या अवस्थेत आहेत. वाढीच्या अवस्थेत असलेला मका, मुग, उडिद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आदी पिकेही वाढीच्या, फुलोऱ्याच्या, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. तुरीची वाढ मात्र खुंटलेली आहे.
ज्या ठिकाणी संरक्षित सिंचनाचे पाणी उपलब्ध आहे, शेततळी आहेत अशा सुमारे ५० हजार हेक्टरवरील खरीप पिकांची अवस्था तुलनेत चांगली आहे. जिल्ह्यात सुमारे १२ हजारांवर शेततळी निर्माण झालेली आहेत.
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३० टक्के पर्जन्यमान झाले आहे तर जूनपासून ऑगस्टपर्यंत केवळ ८७.६ टक्के पाऊस झालेला आहे. शिवाय पावसात खंडही पडलेला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे जमिनीची ओल झपाट्याने सुकू लागली आहे. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झालेला आहे. खरिपाची अवस्था निराशाजनक राहिल्याने आता शेतकरी रब्बीची तयारी सुरू केली. जिल्ह्यातील अनेक भागात कृष्णाष्टमीला रब्बीतील ज्वारीची पेरणी केली जाते. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कांद्याच्या क्षेत्रातही वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. जिल्ह्यात आत्तापर्यंत पडलेला तालुकानिहाय पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- पाथर्डी ५९.४, राहुरी ४०.६, अहिल्यानगर ७७.४, शेवगाव ५८, नेवासा ५८.९, श्रीरामपूर ५२.८, राहता ६७.६, पारनेर १००.८, श्रीगोंदा ११२.८, कर्जत ११०.९, संगमनेर ९९.९, अकोले १६२.४, कोपरगाव ९९.२. एकूण ८७.६ टक्के.
