अहिल्यानगर: यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याच्या पतपुरवठ्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. खरीपासाठी ५ हजार ५४७ कोटी ९५ लाखांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट्य सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार ७३५ कोटी ८१ लाखांनी वाढ करण्यात आली आहे.

मात्र असे असले तरी प्रस्तावित कर्जमाफीच्या घोषणेमुळे बहुसंख्य शेतकर्‍यांनी पीककर्ज फेडीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी थकबाकीत गेले आहेत. थकबाकी भरल्याशिवाय बँक नव्याने कर्ज देत नाही. जिल्ह्यात अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या, केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच ३ लाखाहून अधिक आहे. तसेच जिल्हा बँकेची वसुली अवघी ३५ टक्केच झाली आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परिणामी शेतकर्‍यांना खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही कर्जमाफीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यातून किती शेतकरी कर्जमाफीसाठी आणि किती खरीपातील अर्जासाठी पात्र ठरणार याकडे लक्ष राहील.

यंदाच्या खरीपासाठी ६ लाख १४ हजार ३३३ शेतकरी सभासदांसाठी यंदा ५ हजार ५४७ कोटी ९५ लाखांचा पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य आहे. हे गेल्यावर्षी (२०२५-२६) ३ हजार ८१२ कोटी १४ लाख ७८ हजारांच्या पतपुरवठ्याचे होते. म्हणजे १ हजार ७३५ कोटी ८१ लाखांनी उद्दिष्ट्य वाढवले आहे. सार्वजनिक बँककडून २ लाख ७ हजार ९१८ सभासदांसाठी १ हजार ८८४ कोटी ५३ लाख, खासगी बँकांकडून ५६ हजार ४६६ शेतकऱ्यांसाठी ४७० कोटी ९९ हजार, ग्रामीण बँकांकडून १ हजार २६६ सभासदांसाठी ११७ कोटी तर जिल्हा सहकारी बँकेकडून ३ लाख ४८ हजार ६८६ सभासदांसाठी ३ हजार १८० कोटी ६८ लाखांच्या पतपुरवठ्याचे नियोजन केले आहे. जिल्हा बँकेचे उद्दिष्ट्य यंदा ८६२ कोटी ६० लाखांनी वाढले आहे.

यासह रब्बी हंगामासाठी पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा २ हजार ३७९ कोटी ७ लाख पतपुरवठ्याचे उद्दिष्ट्य २ लाख ६९ हजार २५५ शेतकर्‍यांसाठी करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ७५४ कोटी २९ लाखांची वाढ आहे.

कर्जमाफी केव्हा?

थकबाकीमुळे बँका नव्याने कर्ज देत नाही. राज्य सरकारने ३० जूननंतर कर्जमाफी दिल्यानंतर बँकांकडून पीककर्ज उपलब्ध होईल. तोपर्यंत खरीप हंगामातील पेरणी कशी होणार असा प्रश्‍न आहे. शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत बँका कर्ज वाटप करण्याची शक्यता कमीच. त्यामुळे बँकांना आता कर्ज वाटपाची प्रतीक्षा आहे.