अहिल्यानगर: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर कृषी विभागाने राज्यात सर्वाधिक ३६६ प्रकल्पांना मंजुरी देऊन ते उभारण्यात आले आहेत. या कामगिरीबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे व त्यांच्या पथकाचे राज्याचे कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षभरात उभारलेल्या ३६६ प्रकल्पांना बँकांमार्फत ४८.७० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले तर १८.४३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात १८०१ प्रकल्पांना २०७ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यासाठी उद्योजकांना ७५ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदानही देण्यात आले आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अहिल्यानगर जिल्ह्याला ४७८ प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३६६ प्रकल्पांना मंजुरी देऊन ते पूर्ण करण्यात आले आहेत. ‘पीएमएफएमई’ योजनेत अहिल्यानगर कृषी विभागाने सलग तिसऱ्या वर्षी आघाडी घेतली आहे.
पीएमएफएमई प्रकल्पांना मंजुरी मिळून देणे, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योजकांना प्रोत्साहन व कर्ज मंजुरीसाठी तांत्रिक सहाय्य अशा सर्व आघाड्यांवर अहिल्यानगर कृषी विभागाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेक नवउद्योजकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. अहिल्यानगरच्या कामगिरीवरच महाराष्ट्राला पीएमएफएमई योजनेच्या अंमलबजावणी देशात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान महाराष्ट्राला मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत विविध प्रकारच्या अन्नप्रक्रियांचे १८०१ प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये फळे व भाजीपाला प्रक्रियेचे सर्वाधिक म्हणजे ५८१ प्रकल्प आहेत. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे ४२९, कडधान्य व तृणधान्याचे ३१०, मसाला प्रक्रिया १२३, पशुखाद्य १०९, बेकरी उत्पादने ८५, तेलबिया प्रक्रिया ६६ उद्योगांची उभारणी करण्यात आली. या उद्योगांना एकुण २०७ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून बॅंकांमार्फत वितरित करण्यात आले. त्यावर ७५ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगांना तांत्रिक सहकार्य
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्याने पीएमएफएमई योजनेत मिळवलेले यश हे सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. कृषी विभागाने केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर न देता ग्रामीण भागातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष तांत्रिक सहकार्य व कर्ज पुरवठ्यासाठी मदत केली. त्यामुळे शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. महाराष्ट्राला देशात दुसऱ्या क्रमांकावर नेण्यात अहिल्यानगर जिल्ह्याने खारीचा वाटा उचलल्याचा अभिमान आहे. आगामी काळात आम्ही अधिक वेगाने काम करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळवून देऊ. –सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
