अहिल्यानगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ६५५ लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. या लाभार्थ्यांचा जानेवारी महिना महिन्याचा हप्ता स्थगित ठेवला गेला आहे. लाभासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे या लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता या लाभार्थ्यांची गावनिहाय पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे.
जिल्ह्यातील या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे व पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पडताळणीतून लाभार्थी पात्र ठरणार आहेत की नाही हेही स्पष्ट होणार आहे.
राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत आहे. ही योजना महायुती सरकारसाठी राजकीय लाभाच्या दृष्टीने उपयुक्त ठरली आहे. त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या ती संवेदनशीलही बनली आहे. आता ई-केवायसीमधील सदोष माहितीमुळे महिलांचे हप्ते मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यातून आता राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे. आशा याद्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याकडे पाठवल्या आहेत. नगरसह इतरही जिल्ह्यात ई- केवायसी प्रणालीद्वारे माहिती भरताना चुका होण्याचे प्रमाण आढळलेले आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी योजना राबवली जाते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एक ई-केवायसी करण्यास मुदत देण्यात आली होती. ई- केवायसी करताना महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याची बाब निदर्शनास आली. त्या संदर्भात तक्रारीही झाल्या. मात्र महिलांचे हप्ते मिळण्यात त्यातून अडचणी निर्माण झाल्या.
या पार्श्वभूमीवर योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला, मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. अशा महिलांची संख्या नगर जिल्ह्यात १ लाख २५ हजार ६५५ आढळली आहे.
अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अपुऱ्या माहितीमुळे अनेक महिलांचे अर्ज फेटाळले गेले. परिणामी यापूर्वी नियमित हप्ते मिळत असतानाही या महिलांचे लाभ अचानक बंद झाले. जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार सहाशे पंचावन्न महिलांना हप्ता मिळू शकला नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील जानेवारी महिन्याचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या बंद असणाऱ्या खात्याची पडताळणी केली जाणार आहे. राज्य पातळीवरुन प्रत्येक जिल्ह्याला ई-केवायसीमध्ये अडचणी निर्माण झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाठवली गेली त्यानुसार अंगणवाडी सेविकांमार्फतही पडताळणी करण्याचे आदेश आहेत.
लाभार्थ्यांची संख्या
पडताळणी होणाऱ्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- अहिल्यानगर १७२३०, नेवासा ९५३३, जामखेड ४३३४, पारनेर ६३०४, पाथर्डी ७११५, राहता १००२५, राहुरी ९२९२, संगमनेर १६४१७, शेवगाव ६०८९, श्रीगोंदे ७४०५, श्रीरामपूर ७५४९, अकोले ९१९२, कर्जत ६३४५, कोपरगाव ८८२५.

