अहिल्यानगर : संख्याबळ जास्त असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीची अहिल्यानगरची जागा भाजपकडेच राहील पक्षाची उमेदवारी भाजप पमधील निष्ठावंतांनाच मिळावी अशी माझी ही अपेक्षा आहे मात्र वेगळा निर्णय होऊ शकतो असे मत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज, मंगळवारी नगरमध्ये बोलताना व्यक्त केले. माजी खासदार सुजय विखे हेही इच्छुक असावेत असा दावाही त्यांनी केला.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोहोत्सवाचे आयोजन ३१ मे रोजी करण्यात आली आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सभापती शिंदे यांनी वरील मत व्यक्त केले. देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अशोक खेडकर आदी उपस्थित होते.
उमेदवारीबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असले तरी वेगळा निर्णय होऊ शकतो. भाजपचे सत्यजित कदम, भानुदास बेरड, वसंत लोढा हे निष्ठावान इच्छुक आहेतच शिवाय माजी खासदार शिवजय विखे हेही इच्छुक असावेत. परंतु यापूर्वी त्यांनी आपण मागील दाराने येणार नाही, असे सांगितले आहे याकडे राम शिंदे यांनी लक्ष वेधले.
राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल केला नाही व भाजपला समर्थन दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले. दोघांमध्ये काय ठरले, हे आता ऐनवेळी कळेलच, असेही राम शिंदे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा भाजपलाच मिळेल, असा दावा करताना त्यांनी भाजपच्या निष्ठवांतांना उमेदवारी देईल, अशी अपेक्षा आहे. परंतु ऐनवेळी वेगळा निर्णय होऊ शकतो असाही दावा केला.
राम शिंदे-सत्यजित कदम बंद दाराआड चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेणारे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आज सायंकाळी सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली सत्यजित कदम यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले मतदारांच्या भेटीगाठी आपण सुरू केल्याची माहिती ही त्यांनी दिली.
चौंडी विकास आराखड्यासाठी पाठपुरावा सुरू
गेल्यावर्षी मंत्रिमंडळाची चौंडी येथे बैठक होऊन ६८१ कोटी रुपये खर्चाचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला. परंतु पूरनियंत्रण रेषेचा अभ्यास करण्यामध्ये वेळ गेला, दिरंगाई झाली तरी आपला पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारही सकारात्मक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ३६० कोटी रुपये मंजूर करण्यात आली. त्याच्या निविदा व कार्यारंभ आदेश दिले गेले आहेत. त्याचे भूमिपूजन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे, असेही सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
महोत्सवास निवडणूक आयोगाची परवानगी
चौंडी येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे दत्ता भरणे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. आदल्या दिवशी ३० मे रोजी कुमार विश्वास यांचे कवी संमेलन व प्रवचन तसेच ड्रोन शो व फटाक्यांचे आतषबाजी होणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत बारकाईने लक्ष घालणार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अपेक्षित आहे. सध्या प्रशासक आहे. परंतु आपण बँकेच्या निवडणुकीत केवळ लक्ष घालणार आहोत असे नाही तर बारकाईने लक्ष घालणार आहोत, असेही सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
