अहिल्यानगर: जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत तपासणी करण्याची तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉग. पंकज आशिया यांनी एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी तसेच गॅस कंपन्यांचे अधिकारी व गॅस वितरक उपस्थित होते.

घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याबाबत प्राधान्याने दक्षता घ्यावी, सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी ‘केवायसी’ पूर्ण करून घ्यावी, नियमानुसार गॅस वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी तसेच गॅसची ऑनलाईन नोंदणी करून अधिकृत पुरवठा दाराकाकडूनच गॅस उपलब्ध करून घ्यावा, गॅस वितरणासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास भारत पेट्रोलियम कार्पोरेशन (१८००२२४३३३), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (१८००8२३३३५५५), हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (१८००२३३३५५५) या टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (१०७७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गॅस एजन्सींनी गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत व नियमानुसार करावा. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी तसेच ग्राहकांना वेळेत सेवा मिळेल यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करावे. प्रशासनाने गॅस पुरवठा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

१३ लाख ६० हजार घरगुती गॅसजोडणी धारक

जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅसच्या गोदामांची, एजन्सीची तपासणी करण्यासाठी, काळाबाजार रोखण्यासाठी तालुकानिहाय तसेच नगर अहिल्यानगर शहर व ग्रामीणसाठी दोन अशी एकूण १६ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पुरवठा निरीक्षकांच्या या पथकात पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. जिल्ह्यात एकूण १३ लाख ६० हजार ७७२ गॅसजोडणी धारक आहेत तर गॅस वितरकांची संख्या १०९ व एकूण पेट्रोल पंपांची संख्या ४९३ आहे. सर्व वितरकांकडे तीन ते चार दिवसांचा साठा शिल्लक असतो व साठा संपू लागतो तशी नवीन आवक सुरू असते, त्यामुळे जिल्ह्यात तुटवडा नाही.