अहिल्यानगर: ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा व अघोषित वीज कपात, विजेची वाढीव देयके, तसेच स्मार्ट मीटरला विरोध, अतिवृष्टी व वादळी पावसात नुकसान झालेले विजेचे खांब, रोहित्र, तुटलेल्या तारांची दुरुस्त करावी, रोहित्राअभावी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गटाची पदाधिकारी सहभागी झाले होते. महावितरणचे अधिकारी कर्मचारी, शेतकऱ्यांची आरेरावीने वागतात. पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, असा आरोपही खासदार लंके यांनी केला. मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता विजयकुमार पवार यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये शेवगाव तालुक्यात लोखंडी खांबाऐवजी बांबूंवर विजेच्या तारा ओढल्याची गंभीर बाब नमूद करण्यात आली आहे. मागण्यांची विविध फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते.
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, ग्रामीण भागात अघोषित व अनियमित भारनियमन सुरू आहे. ते तातडीने बंद करा. मीटर रीडिंग न घेताच अंदाजे अवाजवी व वाढीव देयके दिली जात आहेत. ते त्वरित कमी करावीत. जळालेले रोहित्र तातडीने व वेळेत बसवून द्यावेत. महावितरणचे कर्मचारी काम सांगितल्यानंतर साहित्य उपलब्ध नसल्याचे उत्तरे देतात व शेतकऱ्यांना तुम्हीच साहित्य स्वतः विकत घेऊन या, असे सांगत आहेत.
सोलर यंत्रणेतही फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी सोलरसाठी दोनदोन वर्षे पैसे भरूनही त्यांची सौरऊर्जेची प्रकरणे प्रलंबित आहेत. सोलर एजन्सीकडूनही शेतकऱ्यांकडे जास्त पैशांची मागणी केली जाते, अशा एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.
श्रीगोंदे तालुक्यात व नगर शहरामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडल्या, संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी ही मागणी करण्यात आली. मीटर रिडींग घेताना संबंधित यंत्रणा मनानेच अंदाजे रीडिंग टाकले जाते, ही पद्धत बंद करावी, त्यामुळे नागरिकांना भरमसाठ विजेची देयके येत आहेत. दरमहा प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्याचे छायाचित्र काढून देयके द्यावीत अशी ही मागणी खासदार लंके यांनी केली.
मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, ठाकरे गटाचे नगरसेवक योगीराज गाडे, गोविंद मोकाटे, रेवजी नांगरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते.
