अहिल्यानगर: शहरातील इतिहासप्रेमी व संस्था, संघटनांच्या विरोधातून महापालिकेने यापूर्वी घेतलेला, सुमारे ४०० वर्षांची ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द केला असताना आता पुन्हा ही सुस्थितीतील वेस पाडण्याची मागणी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.आता ही मागणी फुले दांपत्य स्मारक समितीच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
येत्या महिनाभरात हा विषय मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, संजय लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माळीवाडा भागातील नियोजित महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, स्मारक भव्य दिव्य व्हावे, त्यासाठी प्रसंगी माळीवाडा वेस पाडावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे ऊर्जास्थान शहरात उभे राहणार आहे. माळीवाडा येथे भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्याच्या कामाला गती मिळावी, यासाठी स्मारक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
स्मारक होण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू व त्या मार्ग लावू असेही किशोर डागवाले यांनी म्हटले आहे. महापालिकेने यापूर्वी १२ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर प्रकटन देत, माळीवाडा वेस या नावाने ओळखली जाणारी पुरातन वेस स्थलांतरित करण्याचा- काढण्यासाठी निवेदने प्राप्त झाली आहेत, या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होते, असे कारण देत ती हटवण्यासाठी-पाडण्यासाठी हरकती मागवल्या होत्या. मात्र शहरातील इतिहासप्रेमी व संस्था, संघटनांनी विरोध केल्याने अखेर महापालिकेने हा निर्णय रद्द केला होता. आता ही मागणी पुन्हा करण्यात आली आहे व त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
माळीवाडा वेशीचा इतिहास
मूळ अहमदनगर या नावाने ओळखले जाणाऱ्या व गेल्या वर्षी अहिल्यानगर असे नामांतर झालेल्या शहराची स्थापना १४९० मध्ये मलिक अहमद निजामशहाने केली. त्यानंतर मुघल सरदार सर्जेखान याने शहराच्या संरक्षणासाठी १६३१ मध्ये ११ वेशी उभारल्या. शहराचे प्रवेशद्वार म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. जकात, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर होत होता. पुढे शहर विकसित होताना सर्जेपुरा, नालेगाव, बंगालचौकी आदि भागातील ९ वेशी कालौघात नामशेष झाल्या.
सध्या केवळ माळेवाडा व दिल्ली दरवाजा अशा दोन वेशी आपले अस्तित्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे दोन्ही सुस्थितीत आहेत. सन २०१८ मध्ये दिल्ली दरवाजा वेस अशीच वाहतुकीला अडथळे होत असल्याचे कारण देऊन महापालिकेने हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे तो बारगळला.
शहराजवळच निजामशहाने भुईकोट किल्ला उभारला हा भुईकोट किल्ला पुढे मराठ्यांच्या ताब्यात असताना १८०३ मध्ये दौलतराव शिंदे सरदार असताना ब्रिटिशांबरोबर तुंबळ लढाई झाली. ही लढाई माळीवाडा वेशीजवळ झाली. माळीवाडा वेस म्हणजेच किल्ला समजून ब्रिटिशांनी हल्ला चढवला होता. मराठ्यांनी ब्रिटिशांना चोख प्रत्युत्तर दिले. ब्रिटिश अधिकारी व ब्रिटिश सैन्य मारले गेले. त्यांची नावे या माळीवाडा वेशीतील एका स्तंभावर कोरण्यात आली आहेत.
१९४२ च्या स्वातंत्र्याच्या लढाईतील शहरातील स्वातंत्र्यसैनिकांची नावे तत्कालीन महापालिकेने माळीवाडा वेशीजवळ स्तंभ उभारून कोरलेली आहेत. याच माळीवाडा वेशीजवळून १ जून १९४८ मध्ये महाराष्ट्रातील पहिली एसटी बस नगर-पुणे असे धावली. यावेशीजवळील वडाच्या झाडाला एसटीची घंटा बांधण्यात आली होती. हे वडाचे झाड आजही अस्तित्व टिकून आहे. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे हे सुद्धा माळीवाडा वेशीजवळच राहत होते. याच माळीवाडा वेशीसमोर अनेक ऐतिहासिक सभाही झालेल्या आहेत.
