राहाता : अहिल्यानगर-मनमाड रस्त्यासाठी लवकरात लवकर डांबर उपलब्ध करून द्यावे, म्हणजे रस्ता पटकन पूर्ण होईल आणि इथले लोक दारू पिणेही कमी करतील अशी उपरोधिक मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एका पत्राद्वारे करीत अनोखे आंदोलन आज, मंगळवारी शिर्डीत केले. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसने हे आंदोलन केले.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा नगर-मनमाड रस्ता पूर्ण होत नाही. अनेकवेळा हा रस्ता अर्धवट राहिला. जेव्हा या रस्त्याचे काम झाले तेव्हा ते निकृष्ट दर्जाचा झाले. अनेकवेळा कंत्राटदार बदलले, शेकडो लोकांचा जीव या रस्त्याने घेतला. आजारपण, अपंगत्व, व्यावसायिक अडचणी, साईभक्तांना होणारा त्रास, वाहनांचे नुकसान असे प्रकार वर्षानुवर्षे सातत्याने सुरू आहेत.
आम्हाला वाटायचे या सर्व प्रकाराला इथले मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी व ठेकेदार हेच लोक जबाबदार आहेत की काय ? परंतु भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी खरी वस्तुस्थिती इथल्या जनतेसमोर आणली आहे. त्यांनी सांगितले आहे की, नगर-मनमाड रस्त्याला डोनाल्ड ट्रम्पच जबाबदार आहेत. त्यांच्या युद्धखोर स्वभावामुळे या रस्त्यासाठी लागणारे डांबर मिळत नसल्यामुळे हा रस्ता होत नाही. तसेच या सर्व प्रकारामुळे इथले लोक जास्त प्रमाणात दारू सुद्धा प्यायला लागले आहेत. ट्रम्प तात्या, तुमच्या लहरी व युद्धखोर स्वभावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
त्याचबरोबर सुजय विखे यांनी म्हटले की, तुमच्यासारखा वेडा माणूस पाहिला नाही. पण काय करणार गरजवंताला अक्कल नसते, म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, नगर-मनमाड रस्त्यासाठी लवकरात लवकर डांबर उपलब्ध करून द्यावे. म्हणजे रस्ता पटकन पूर्ण होईल आणि इथले लोक दारू पिणेही कमी करतील, असे चौगुले यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी येथिल टपाल पेटीद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील व्हाइट हाऊस या पत्यावर पाठविले आहे.
रस्त्याचा विषय आंतरराष्ट्रीय
डॉ. सुजय विखे यांनी या रस्त्याच्या बाबतीत खुलासा केल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो. या रस्त्याच्या कामासाठी अनेकांनी आंदोलन केली. त्यावर सरकारने हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला. परंतु वर्षानुवर्ष हा रस्ता अर्धवटच राहिल्याने झालेल्या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. विखे यांनी ट्रम्प यांच्यामुळेच हा रस्ता होत नाही असा खुलासा केल्यानेच या रस्त्याच्या कामासाठी लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. असे धांदाट खोटे निघाले, आता हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्याने आम्ही हा पत्र व्यवहार केला आहे. युद्ध थांबवा अगर थांबू नका पण या रस्त्याच्या कामाला डांबर उपलब्ध करून द्या.-सचिन चौगुले, अध्यक्ष, राहाता तालुका काँग्रेस.
