अहिल्यानगरः राज्यभर गाजत असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता तयार केली आहे. त्यामध्ये हुंडा घेऊ नका व देऊ नका याबरोबरच लग्नात डीजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ११ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची बैठक अहिल्यानगरमध्ये एन. बी. धुमाळ फाउंडेशनने आयोजित केली होती. या वेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे, जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष राज्यश्री शितोळे, किशोर मरकड, मराठा वधू-वर सूचक मंडळाचे अशोक कुटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, विठ्ठल गुंजाळ, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर माहिती देताना हभप तनपुरे महाराज यांनी सांगितले, की मराठा समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी, बदल करण्यासाठी प्रथम स्वतः प्रत्येकाने बदल करावा. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय समिती स्थापन करावी. डॉ. निमसे म्हणाले, विवाह सोहळ्याच्या आचारसंहितेबाबत जनजागृती करण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकार यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागात मुलांच्या विवाहाची समस्या मोठी आहे. त्यावरही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. चंद्रकांत गाडे म्हणाले, ‘विवाहाच्या वेळी मुलींकडून अवास्तव अटी येऊ लागल्याने मुलांचे विवाह होत नाहीत. त्यामुळे विवाहेच्छू मुलांबरोबरच पालकही हतबल झाले आहेत. पालकांनी आपल्या अतिरिक्त अपेक्षा कमी कराव्यात.
आचारसंहिता पुढीलप्रमाणे –
मराठा समाजाने विवाह सोहळा १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा. केवळ पारंपरिक वाद्य व लोककलावंतांचा वापर करावा. प्री-वेडिंग हा प्रकार बंद करावा. विवाह, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात साड्या, भेटवस्तू देऊ नयेत. लग्नात हुंडा देऊ व घेऊ नये. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करावे. दशक्रिया विधी व तेराव्याच्या निमित्ताने घातली जाणारी भोजनावळ बंद करावी.