अहिल्यानगर : महापौरपद युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) जाणार हे जवळपास स्पष्ट झाले असले तरी या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची स्पष्टता अद्याप पक्षाच्याच नगरसेवकांना आलेली नाही. याबाबतची उत्सुकता पक्षाचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी कायम ठेवली आहे. ज्यांचे नाव अंतिम होईल, ते नाव बंद पाकिटातून ऐनवेळी सभागृहात पाठवले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज, सोमवारी असली तरी महापौरपदाचा उमेदवार कोण हे ६ फेब्रुवारीलाच, निवडीच्या दिवशीच उघड होणार आहे.

आज महापौर व उपमहापौर पदासाठी भाजप व राष्ट्रवादी युतीकडून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापौर कोण होणार याची उत्कंठा कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. युतीकडे निर्विवाद बहुमत असल्याने पहिला महापौर युतीचा होणार हे स्पष्ट आहे. भाजप की राष्ट्रवादीचा महापौर होणार याची उत्सुकता आहे. मात्र संख्याबळ अधिक असल्याने राष्ट्रवादीचा दावा भाजपपेक्षा प्रबळ ठरण्याची शक्यता आहे. ही उत्सुकता शिगेला नेण्याचे काम आमदार जगताप व माजी खासदार विखे यांनी सुरू केले आहे.

युतीचे ५२ नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादी २७ तर भाजपचे २५ नगरसेवक आहेत. अर्थात युती होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचा महापौर करण्याचे ठरले आहे. कोणत्या पक्षाच्या किती जागा हा निकष न लावता राष्ट्रवादीकडे महापौर राहणार असल्याचे युतीमध्ये यापूर्वी ठरले आहे. परंतू पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्यापही याबाबत मौन पाळले आहे. युतीचा महापौर होणार पण अचानक पालकमंत्री पदाच्या प्रतिष्ठेसाठी महापौर भाजपचाच हवा अशी खेळी भाजपने केली तर राष्ट्रवादीला भाजपच्या हो ला हो द्यावी लागणार आहे. त्यामुळे महापौर कोण याचा ‘सस्पेंस’ कायम ठेवण्यात आला आहे.

महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेतून निवडून आलेल्या नऊ महिला नगरसेविका असून, यात राष्ट्रवादी व भाजप यांच्या प्रत्येकी ३, शिवसेना (शिंदे गट) दोन व एमआयएमची एक महिला आहे. अर्थात महापौर हा युतीचा होणार असला तरी तो राष्ट्रवादी की भाजप असा प्रश्‍न आहे. मात्र पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादीकडे महापौरपद रहाणार असल्याने राष्ट्रवादीमध्ये ज्योती गाडे, वर्षा काकडे, सुजाता पडोळे व आशा डागवाले हे दावेदार आहेत.

महापौरपदासाठी पात्र असलेल्या उमेदवार भाजपमध्ये गटनेत्या शारदा ढवण, पुष्पा बोरुडे व आशा कातोरे तर राष्ट्रवादी अजित पवार गटात सुजाता पडोळे, वर्षा काकडे व अश्विनी लोंढे. शिंदे गटाच्या रुपाली दातरंगे व मंगल लोखंडे व एमआयएमच्या शहेनाज शेख अशा नऊ नगरसेविका आहेत. याशिवाय सर्वसाधारण जागांवर निवडून आलेल्या ओबीसी महिलांमध्ये ज्योती गाडे, आशा डागवाले, सुनीता फुलसौंदर व संध्या पवार याचाही विचार होऊ शकतो. त्याप्रमाणे इच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत. ओबीसीसाठी महापौरपद असल्याने ओबीसी जागेवरून, तसेच ओबीसीचा दाखला असलेले; पण सर्वसाधारण जागेवरून निवडून आलेल्यांचीही नावे चर्चेत आली. त्यातील कुणाच्या पारड्यात महापौरपद पडणार हे अजूनही नेत्यांनी निश्‍चित केलेले नाही.

दरम्यान, महापौरपदाचा उमेदवार आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे हे एकमताने निश्‍चित करणार आहेत. त्याचे नाव बंद पाकिटातून पाठविण्यात येणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महापौरपदाचा केवळ एक अर्ज दाखल न करता अनेक अर्ज दाखल करण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महापौर कोण याची उत्कंठा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आमदार जगताप व डॉ. विखे रणनिती तयार करीत आहेत.