अहिल्यानगर : महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे व उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची नावे आज, सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केली. ही निवड सव्वा-सव्वा वर्षांसाठी आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे उपस्थित होते. ज्योती गाडे या भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या तर आमदार जगताप यांच्या मेहुणी आहेत. राज्यात अजित पवार गटाला मिळालेले हे एकमेव महापौरपद असल्याची चर्चा होत आहे.

महापौरपद प्रथम अडीच वर्षात सव्वा-सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीकडे तसेच उपमहापौर पद पहिल्या अडीच वर्षात भाजपकडे सव्वा सव्वा वर्षासाठी असणार आहे श. त्यामुळे मुदत संपली की संबंधितांनी प्रामाणिकपणे राजीनामे द्यावेत, अशी अपेक्षा माजी खासदार विखे यांनी व्यक्त केली. आमदार जगताप यांनीही त्यास दुजोरा दिला. याच क्रमाने नंतरच्या अडीच वर्षात भाजपकडे महापौर पद सव्वा-सव्वा वर्षासाठी तर राष्ट्रवादीकडे उपमहापौर सव्वा-सव्वा वर्षासाठी ठरवले गेले असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.

महापौर व उपमहापौर पदाची निवड ६ फेब्रुवारीला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. पालकमंत्री विखे यांनी निवड जाहीर करतात ज्योती गाडे व धनंजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. विरोधकांकडे संख्याबळ नसल्यामुळे दोघांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने २७ तर विखे पिता- पुत्रांच्या नेतृत्वाखालील भाजपने २५ जागा पटकावल्या. दोघांच्या युतीने ६७ पैकी ५२ जागा पटकावत महापालिकेवर राष्ट्रवादी-भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. महापालिकेवर पूर्वी एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व होते. सर्वात मोठा पक्ष म्हणून नगर शहरात शिवसेना कार्यरत होती. फुटीनंतर अपवाद वगळता सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी दीर्घकाळ एकहाती सत्ता प्राप्त झाली. यंदा शिवसेनेला (शिंदे गट) केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले.

महापौरपदासाठी महिला ओबीसी आरक्षण सोडती द्वारे निघाले ज्योती गाडे महिला ओबीसी साठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या नाहीत. मात्र त्या ओबीसी प्रवर्गातील आहेत. महापौर व उपमहापौर पदाचे वाटप झाले असले तरी अद्याप स्थायी समिती सभापती महिला व बालकल्याण समिती सभापती सभागृह नेतेपद अशा इतर सत्तेच्या पदांचे वाटप झालेले नाही, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले. मात्र स्वीकृत नगरसेवक पदाची मुदतही सव्वा- सव्वा वर्षासाठी असेल असे माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितले. मात्र त्याला मंत्री विखे व आमदार जगताप यांच्याकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

महापौर व उपमहापौर उत्पादनाचे नाव निश्चित करण्यासाठी शहरातील हॉटेलमध्ये मंत्री विखे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी व भाजप यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली त्यामध्ये ज्योती गाडे व धनंजय जाधव यांची नावे जाहीर करण्यात आली. महापौर पद मूळ कुणबीला मिळावे अशी मागणी होत होती, याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री विखे म्हणाले, अशी मागणी कोणी केली याची माहिती आमच्याकडे नाही. अशी माझ्याकडे कोणीही मागणी केली नाही. ही कोणाच्या तरी डोक्यातून आलेली मागणी आहे.