अहिल्यानगर: शहरातील सावेडी उपनगरात दोन महिन्यांपूर्वी, गेल्या जुलैमध्ये पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेने आतापर्यंत ५८ संशयित आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. त्यापैकी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणारे, विक्री करणारे तसेच त्याचे सेवन करणार्‍यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज, मंगळवारी पत्रकारांना दिली.

तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील मिस्किन मळा परिसरात एका मोटारीवरवर कारवाई केली होती. वाहनाच्या तपासणीत सुमारे १५० ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या घरझडतीत आणखी ५ ग्रॅम अमली पदार्थ आढळले होते.

या गुन्ह्याच्या तपासात तोफखाना पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासात अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या व्यक्तींपर्यंत पोलीस पोहोचले तसेच अहिल्यानगर शहरात अमली पदार्थांची विक्री करणार्‍या व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या तपासात अमली पदार्थ सेवन करणारे काहीजण निष्पन्न झाले. त्यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. आतापर्यंत असे एकूण ५८ संशयित निष्पन्न झाले. त्यातील २१ जणांना अटक करण्यात आली. अन्य संशयित आरोपींचा शोध सुरू असून पसार असलेल्या आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले.

 ‘ड्रग्ज फ्री अहिल्यानगर’ मोहीम

दरम्यान, जिल्हा पोलीस दलाकडून ‘ड्रग्स फ्री अहिल्यानगर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, ड्रग्सची विक्री किंवा सेवन करणार्‍यांबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. नागरिकांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारे पोलिसांना कारवाई करण्यास मदत होईल. अहिल्यानगर ड्रग्समुक्त करण्याच्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे आवाहन अधीक्षक सुदर्शन यांनी केले.