अहिल्यानगर: केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) बंद करून विकसित भारत रोजगार व अजिविका हमी अभियान (जी-राम-जी) सुरू केली असली तरी अहिल्यानगर जिल्ह्यात मनरेगाची ४१ हजार ८०८ कामे अपूर्ण राहिलेली आहेत. मनरेगातील एकुण ६० हजार २०८ कामे पूर्ण करण्यासाठी एप्रिलनंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र या काळात केवळ १८ हजार ६०० कामे पूर्ण होऊ शकली.
‘जी-राम-जी’ योजना सुरू करताना आता मनरेगामध्ये अपूर्ण राहिलेली कामे नवीन योजनेत हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र योजना हस्तांतरण प्रक्रिये दरम्यान गेल्या पाच-सहा दिवसांपासून सर्वच कामे बंद अवस्थेत आहेत. मजुरांच्या कामाचे मस्टरही बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती उपलब्ध झाली.
मनरेगामधील प्रलंबित कामांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे अहिल्यानगर २२०४, अकोले २३१२, जामखेड ६५७२, कर्जत ६१४५, कोपरगाव २१०२, नेवासे ३२५७, पारनेर २३८८, पाथर्डी ३६४६, राहता १९९०, राहुरी १५७३, संगमनेर ३००२, शेवगाव ३०३५, श्रीगोंदा २४००, श्रीरामपूर ११८२.
केंद्र सरकारच्या नवीन ‘जी-राम-जी’ योजनेची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शाश्वत उपजीविका, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, विभागीय वन आधिकारी अमोल जाधव, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक सुभाष सातपुते, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, जिल्हा समन्वयक विकास घिगे आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांनी सांगितले की, अकुशल काम करणाऱ्या प्रत्येक प्रौढ सदस्याला केंद्र सरकारकडून १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. अभियान अंतर्गत ३१८ प्रकारची कामे मंजूर असून मजुरीचा दर प्रति दिन ३१७ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
