‘पीएनजी’ पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश

अहिल्यानगर : औद्योगिक क्षेत्राला ‘पीएनजी’चा (बंदिस्त वाहिन्यांद्वारे नैसर्गिक वायू) पुरवठा करण्यासाठी गॅस कंपन्यांनी युद्धपातळीवर त्रुटी दूर कराव्यात, जिल्हाधिकारी व एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी यामध्ये समन्वय निर्माण करावा अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्योजकांच्या बैठकीत दिल्या. गॅस टंचाईमुळे उत्पादन बंद राहिल्यास त्याचा परिणाम कामगारांवर झाल्यास सवलती देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडू असेही आश्वासन त्यांनी दिले.

औद्योगिक क्षेत्राला जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योजक अनंत देसाई यांच्या पुढाकारातून मंत्री विखे यांच्या उपस्थितीत असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) या उद्योजकांच्या संघटनेची बैठक आज, रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री विखे बोलत होते.

जिल्हा महापौर ज्योती गाडे, महापालिका स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, बीपीसीएलचे क्षेत्रीय अधिकारी मनोज जाधव, एचपीसीएलचे विक्री व्यवस्थापक ब्रिजेश कुमार, ‘आमी’चे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्यासह अहिल्यानगर, सुपा, नेवासे, श्रीरामपूर येथील उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बडे यांनी एलपीजीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने १५ प्राधान्य क्षेत्र ठरवून दिली आहेत, असे सांगितले, त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश नसल्याचेही उघड झाले.

औद्योगिक वापराच्या गॅस टंचाईमुळे अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, याकडे उद्योजकांनी लक्ष वेधले. त्यावर ‘पीएनजी’चा पुरवठा करण्यासाठी त्रुटी दूर करण्याचे सूचना मंत्री विखे यांनी दिल्या. सध्या ‘पीएनजी’चा पुरवठा करण्यासाठी पाईप, मीटर उपलब्ध नसल्याच्या कंपन्या सांगतात, त्यामुळे पुरवठ्यात दिरंगाई होत आहे, मागणी करून दोन-दोन महिने अर्ज प्रलंबित राहतात, असे उद्योजकांनी सांगितले.

क्षेत्रीय अधिकारी जाधव यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही पीएनजीचे जोड घ्यावेत म्हणून पाठपुरावा करत होतो, मात्र आता गॅस टंचाई जाणवू लागल्यानंतर एकदम मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले. औद्योगिक कंपन्यांचे तंत्रज्ज्ञ यासाठी मदत करतील तसेच गॅस कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवून रात्रंदिवस काम करावे, अशी सूचना विखे यांनी केली.

अनंत देसाई व ‘आमी’चे अध्यक्ष खाकाळ यांनी गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या अडचणी विशद केल्या. अरविंद पारगावकर, राजेंद्र कटारिया, प्रवीण बजाज, दिलीप अकोलकर, दौलत शिंदे, चिन्मय सूखठणकर, महेश इंदानी, सुनील कानवडे, राजेंद्र शुक्रे, तेजस इंगळे, सुहास भिंगारे, पुरुषोत्तम नावंदर, मयूर गवळी, नागराज बडगिरी, प्रवीण बोरले, रोहन गांधी, प्रवीण जुंद्रे, विकास पानसंबळ, वरूण भगत, दिनेश अग्रवाल, उदय खिलारी आदी उपस्थित होते.

परप्रांतीय कामगार निघून जाण्याची भीती

गॅस टंचाईमुळे कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. कंपन्या कामगारांसाठी चालवत असलेल्या उपाहारगृहातून जेवण, नाश्ता मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कामगार, विशेषत: परप्रांतीय कामगार निघून जाण्याची शक्यता आहे, याकडे उद्योजकांनी लक्ष वेधले. कंपन्यांमधील उपहारगृहांना ५० टक्के रॉकेल पुरवठा करण्याचे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले.

पाच दिवसांच्या आठवड्याचा पर्याय

गॅस टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने सवलती द्याव्यात अशी मागणी उद्योजकांनी केली. त्यावर उद्योजकांनी तसा प्रस्ताव दिल्यास आपण मुख्यमंत्र्यांकडे मांडू असे आश्वासन मंत्री विखे यांनी दिले. काही उद्योजकांनी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली. त्यावर विखे यांनी उद्योजकांच्या संघटना पुढे येऊन असा निर्णय स्वतः करू शकतात, असे स्पष्ट केले.

खोदाई दर कमी करा, मनपाला सूचना

महापालिकेच्या खोदाई परवानगी अभावी अहिल्यानगर शहरात बंदिस्त पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचे ४० हजार कनेक्शन प्रलंबित असल्याकडे बीपीसीएलचे क्षेत्रीय अधिकारी मनोज जाधव यांनी लक्ष वेधले. महापालिकेचा खोदाई दर खूप जास्त आहे, गेल्या दोन-तीन वर्षांपासून परवानगी प्रतीक्षेत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मंत्री विखे यांनी महापालिकेने दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना महापौर व स्थायी समितीच्या सभापतींना केली.

एमआयडीसीतील अतिक्रमणे हटवा

सुपा औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे साफ करण्यात आली. त्याच पद्धतीवर नगरच्या एमआयडीसीतील अतिक्रमणे साफ करावीत, अशा सूचना मंत्री विखे यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांना केली. पुन्हा याची आठवण करायला लावू नका, असेही त्यांनी बजावले. नगर एमआयडीसीमध्ये दादागिरी वाढत चालले आहे, त्यातून वातावरण खराब होत आहे, त्याचाही पोलिसांमार्फत बंदोबस्त करू असेही आश्वासन मंत्री विखे यांनी दिले.