अहिल्यानगर: नगरच्या औद्योगिक क्षेत्रात (एमआयडीसी) वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने औद्योगिक उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. उद्योजकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे ‘महावितरण’ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्योजकांच्या ‘असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’ (आमी) संघटनेच्या वतीने आज, शुक्रवारी महावितरणच्या शहरातील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उद्योजकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी ‘आमी’चे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष राजेंद्र शुके, रोहन गांधी, सतिश गवळी, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र कटारिया, दिलीप अकोलकर, मिलिंद भद्रे, राजेंद्र कुलकर्णी, सुमित सोनवणे, रोहन गांधी, प्रवीण जुंदरे, सतीश गवळी, अमोल घोलप, सागर निंबाळकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
उद्योजकांच्या निवेदनात म्हटले की, नगर एमआयडीसी परिसरात मागील सहा ते सात महिन्यापासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत विशेषता डी, एफ, ए आणि एल ब्लॉकमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे उद्योजकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे तसेच एमआयडीसीतील इतर ब्लॉकमध्ये वीजपुरवठाच्या लपंडाव सुरू आहे.
संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ म्हणाले, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. यंत्रसामुग्री बंद पडणे, कच्च्या मालाचे नुकसान होणे, उत्पादन क्षमतेवर परिणाम होणे, वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम उद्योजकांच्या उत्पादन खर्चावर व आर्थिक व्यवहारावर होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अनेक कारखाने बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. अहिल्यानगरमध्ये उद्योगाची वाढती संख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता परिसरात नवीन वीज उपकेंद्र उभारणे किंवा विद्यमान उपकेंद्राची क्षमता व वीजभार वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात आमी संघटनेने यापूर्वीही पाठपुरावा केला. डिसेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
राजेंद्र शुक्रे यांनी सांगितले की, उद्योगांना अखंडित वीजपुरवठा देणे हे औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे हे औद्योगिक उत्पादन, रोजगार आणि संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम करणारे आहे. जवळपास तीस ते चाळीस हजार कामगार एमआयडीसीत कामाला आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला मिळालेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागते. उद्योग वाढण्यापेक्षा समस्यांशी लढणे हाच मोठा उद्योग होऊन बसलाय. नगरमध्ये नवीन उद्योग वाढले नाहीत उलट शहराबाहेर उद्योग गेले.
