अहिल्यानगर: राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी आणि दुधाची गुणवत्ता एकसमान टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रशासनाने दोनवेळा दूध संकलन करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. काही तालुक्यातून अद्यापि एकवेळाच दूध संकलन होते आहे. परिणामी दूध भेसळ व गुणवत्ता या दोन्ही बाबींवर परिणाम हो
जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संकलन करणारे केंद्रचालकही खर्च वाचवण्यासाठी एकवेळा संकलन करतात. काही तालुक्यातून दोनवेळा दूध संकलन होत असले तरी काही तालुक्यात मात्र एकवेळाच दूध संकलन केले जात आहे. दूध व्यवसायातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार एकदा दूध संकलन करून त्यास साठवून ठेवल्याने दुसऱ्या वेळीचे दूध, त्या शिळ्या दुधात मिळवून संकलन केल्यास त्याची अल्कोहोल चाचणी सकारात्मक येते. परिणामी दुधाची ‘हिट स्टॅबिलिटी’ कमी होते. त्याचा परिणाम उच्च गुणवत्तेचे दुग्धजन्य पदार्थावर तयार करण्यावर होतो. चीज, दूध भुकटी, बटर, स्कीम मिल्क (मलई विरहित भुकटी) हे पदार्थ तयार करताना, दूध पावडर तयार होण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
जिल्ह्यात रोज सुमारे ४७ लाख लिटर दूध उत्पादन होते. राज्याच्या दूध उत्पादनात जिल्ह्याचा वाटा सुमारे ३५ टक्के आहे. साठवून ठेवलेल्या दुधाची गुणवत्ता कमी होते. ती निर्माण करण्यासाठी अनेकदा भेसळीचा मार्ग अवलंबला जातो. जिल्ह्यात सहकारी, खाजगी, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ५०० हून अधिक दूध संकलन केंद्र आहेत. यामध्ये सहकाराचा वाटा केवळ २५ टक्के इतकाच आहे.
दुधाची गुणवत्ता टिकवून राहावी व दूध भेसळीस प्रतिबंध व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व दूध संकलन केंद्रांचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन दोनवेळा दूध संकलन व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची सूचना केली आहे. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात दूध भेसळीच्या काही घटना उघडकीला आलेल्या आहेत.
दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, अकोले या तालुक्यात बहुतांशी ठिकाणी दोनवेळा दूध संकलन होते. मात्र पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर या तालुक्यात एकवेळाच दूध संकलन करण्याकडे कल आहे. या तालुक्यातील बहुतांशी दूध पुणे जिल्ह्यात जाते. पुणे जिल्ह्यातील प्रकल्प मोठ्या क्षमतेचे आहेत. त्यांच्याकडून अनेकदा कमी गुणवत्तेचे दूधही स्वीकारले जाते. त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी शेतकरी आणि संकलन केंद्र एकावेळाच संकलन करतात.
उच्च गुणवत्तेसाठी
जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. उच्च गुणवत्तेच्या प्रतीचे दूध हेच ध्येय ठेवून व्यवसाय करणे आवश्यक आहे. जेणेकरून व्यवसायाला अधिक चालना मिळेल. दुधाची उच्च गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी दोनवेळा दूध संकलन व्हावे, यासाठी जनजागृती केली जात आहे. – गिरीश सोनोने, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी.
