अहिल्यानगर: राज्य सरकारच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार १४ शिधापत्रिकाधारक सवलतीने धान्य मिळण्याच्या प्राधान्य गटाच्या यादीतून वगळले आहेत. पुरवठा विभागाने सध्या ‘मिशन सुधार’ मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. वरिष्ठ पातळीवरून दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जात आहे. मात्र ऐन दुष्काळी परिस्थितीत ही मोहीम तीव्र केल्याने या मोहिमेबद्दल आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. दुष्काळी परिस्थिती व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेमुळे लाभार्थ्यांपुढे अडचणीही निर्माण झाल्या आहेत. या अडचणी लक्षात घेऊन ही मोहीम तात्पुरत्या स्वरूपात थांबवावी, अशीही मागणी होत आहेत.
‘मिशन सुधार’ मोहिमेमुळे सवलतीच्या प्राधान्य गटातून शिधापत्रिकाधारक वगळले गेले असले तरी त्यांच्या शिधापत्रिका कार्यरत असणार आहेत. केवळ त्यांना सवलतीचे धान्य मिळणार नाही. अपात्र, बनावट, मृत, स्थलांतरित, निष्क्रिय, प्राप्तिकर भरणारे, कुटुंबात एकमेव असलेली व्यक्ती, कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांची नावे अठरा वर्षांपेक्षा कमी आहे, वाहनधारक, शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाचे अशा विविध कारणांनी लाभार्थी व त्यांच्या शिधापत्रिका प्राधान्य गटाच्या यादीतून वगळण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने गरजू व पात्र शिधापत्रिका धारकांना सरकारी सवलतीच्या स्वस्त धान्याचा लाभ मिळावा तसेच अन्नसुरक्षा योजनेतील गैरव्यवहार रोखणे व बनावट शिधापत्रिका रद्द करण्यासाठी ‘मिशन सुधार’ही मोहीम सुरू केली असली तरी त्याचा फटका सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतील नागरिकांना बसत आहे. दुष्काळी परिस्थिती व सणासुदीचे दिवस यामुळे ही मोहीम राबवण्याची ही योग्य वेळ नसल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.
राज्य सरकारकडून जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या यादीच्या आधारे वरील निकषानुसार लाभार्थ्यांची नावे, धान्य वितरणाचे ई-पॉस यंत्र, पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार या माध्यमातून तपासणी करून शिधापत्रिका प्राधान्य गटातून वगळल्या जात असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात एकूण ६ लाख २० हजार ७९२ शिधापत्रिका सवलतीच्या दराने धान्य मिळणाऱ्या प्राधान्य गटाच्या यादीत आहेत.
आत्तापर्यंत या मोहिमेत आधार संलग्न नसलेल्या २८०३, बनावट लाभार्थी ७६०१४, प्राप्तिकर भरणारे ८५२२४, कुटुंबात एकमेव लाभार्थी असलेले ७२२०, ज्यांचे वय १०० पेक्षा अधिक झाले आहे असे २८१४, निष्क्रिय शिधापत्रिका धारक ८०३३, वाहनधारक असलेले २२६, ज्या कुटुंबात १८ वर्षापेक्षा कमी असलेली एकमेव व्यक्ती आहे असे १३७, जीएसटी भरणारे ५५१९, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमध्ये संचालक असणारे ७२२० असे एकूण १ लाख ८९ हजार १४ शिधापत्रिका धारक सवलतीच्या धान्य गटातून वगळण्यात आले आहेत.
रोजगार, मजुरी आणि आता धान्याचा प्रश्न
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सध्या रोजगाराचा तसेच शेतात काम नसल्यामुळे मजुरीचाही प्रश्न जाणवत आहे. राज्य सरकारने पिचलेल्या सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज असताना सवलतीच्या धान्याची योजना बंद केली जात आहे. सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत ही मोहीम थांबवावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेईल.
–सिताराम काकडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).
मोहीम चुकीच्या वेळी
दुष्काळासारख्या अडचणीच्या परिस्थितीत आणि ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांची सवलतीच्या धान्याची योजना बंद केली जात असेल तर ‘मिशन सुधार’ योजना चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे. या विरुद्ध शिवसेना आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारेल. सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत ही मोहीम तूर्त थांबवण्याची आवश्यकता आहे. -राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
