अहिल्यानगर: शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी, शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८० टक्के पाठ्यपुस्तके पोहोच झाली आहेत. मात्र असे असले तरी यंदा बदललेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके अद्याप पुरेशा संख्येने उपलब्ध झालेली नाहीत. जिल्ह्यासाठी एकूण २१ लाख ६७ हजार ५८७ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १७ लाख २४ हजार ६३३ प्राप्त (७९.५६ टक्के) झाली आहेत. ४ लाख ४२ हजार ९५४ प्रती मिळणे अद्याप प्रतीक्षेत आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली. केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके देण्याची कल्याणकारी योजना राबवली जाते. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांची शिक्षण थांबू नये, शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थित राहावी, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जातात.

यासाठी विद्यार्थ्यांना जातीची किंवा उत्पन्नाची कोणतीही अट नाही. ही पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळमार्फत (बालभारती) शाळांपर्यंत पोहोचवली जातात. यंदा केंद्रस्तरावर पुस्तके न पाठवता ती आता बालभारतीच्या पुणे कार्यालयातून तालुकास्तरावर व तालुका स्तरावरून शाळास्तरावर पाठवली जाणार आहेत. त्यासाठी १.५ रुपये प्रति किलो वाहतूक दर ठेकेदाराला दिला जाणार आहे. तालुकास्तरावर ८० टक्के पाठ्यपुस्तके पोहोच झाली असून ती काल, शुक्रवारपासून शाळा स्तरावर पोहोच करण्यास सुरुवात झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी पहिलीचा अभ्यासक्रम बदलला होता. यंदा दुसरी, तिसरी, चौथी व सहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. पुढील वर्षी पाचवी, सातवी व आठवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. बदललेल्या दुसरी, तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमातील काही विषयांची पाठ्यपुस्तके वगळता ८० टक्के पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. याशिवाय अद्याप उर्दू अभ्यासक्रमाची पुस्तके प्राप्त झालेली नाहीत. १५ जूनला शाळा सुरू होत आहेत.

शाळा सुरू होण्याच्या दिवशी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. उर्वरित पाठ्यपुस्तके १५ जूनपूर्वी पोहोच होतील, अशी अपेक्षा प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात संगमनेर, पाथर्डी, पारनेर, राहुरी, अकोले, श्रीगोंदे या तालुक्यांना ८० टक्क्याहून अधिक तर श्रीरामपूर, शेवगाव, राहाता आदी तालुक्यांना ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पुस्तकांचा पुरवठा झालेला आहे.

मागणी व पुरवठा

तालुकानिहाय मागणी करण्यात आलेल्या पुस्तकांची संख्या व पुरवठा झालेल्या पुस्तकांची टक्केवारी पुढीलप्रमाणे: अहिल्यानगर १ लाख ६० हजार ४०७ (७८.७३ टक्के), संगमनेर २ लाख ६० हजार ९५७ (८१.६८), नेवासा २ लाख २ हजार २२१ (७९.२८), पाथर्डी १ लाख २७ हजार ९१४ (८७.२८), पारनेर १ लाख २५ हजार ५९३ (८७.८७), राहुरी १ लाख ६४ हजार ८७ (८२.०७), कर्जत १ लाख २८ हजार ९७८ (८२.९१), जामखेड ८७ हजार १९१ (७८.२०), कोपरगाव १ लाख ६७ हजार ३७० (८२.०९), श्रीरामपूर १ लाख ४८ हजार २५४ (६३.६५), अकोले १ लाख ४३ हजार ६९६ (८३.५१), श्रीगोंदे १ लाख ६३ हजार ९०८ (८३.४७), शेवगाव १ लाग३२ हजार ७१३ (६८.७६), राहाता १ लाख ५४ हजार २९८ (७३.४२ टक्के) एकूण मागणी २१ लाख ६७ हजार ५८७. आतापर्यंत पुरवठा झालेल्या प्रति २७ लाख २४ हजार ६३३ (७९.५६ टक्के). शिल्लक ४ लाख ४२ हजार ९५४ प्रती.