अहिल्यानगर:नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. अनेक भागात रिमझिम स्वरूपाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील पावसाने भीमा नदीत तर नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील या दोन्ही नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नगर शहरात आज, सोमवारी दिवसभर कमीअधिक स्वरूपाची संततधार सुरू होती, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात आज व उद्या, मंगळवारी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

आज सकाळी नोंदवला गेलेला गेल्या २४ तासात जिल्ह्यात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (आकडेवारी मिमी.मध्ये)- नगर १२.५, पारनेर २६.२, श्रीगोंदे २४, कर्जत ९.३ जामखेड ५.९, शेवगाव ०.५, पाथर्डी ०.७, नेवासा १, राहुरी ०.७, संगमनेर ९, अकोले २६.७, कोपरगाव ६.१, श्रीरामपूर १.१, राहता ३.२, एकूण १०.४ मिमी. गेल्या दोन दिवसाच्या पावसाने हवेतील उष्मा कमी होऊन त्याची जागा आता गार वाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हवेत चांगला गारठा निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने भीमा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातून (दौंड पुलाजवळ) २७ हजार ८४७ तर नाशिकमधील पावसाने गोदावरी नदीपात्रातून ८०० क्यसेक्सने पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नगर शहरात गारठा

नगर शहरात काल व आज दोन दिवस कमीअधिक स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज शहरातील जनजीवनावर त्याचा परिणाम झालेला दिसला. हवेत गारठा निर्माण झाला होता. रात्रीपासूनच पाऊस सुरू होता. शाळेत, कामावर जाण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांना छत्र्या घेऊन व रेनकोट घालूनच बाहेर पडावे लागले. रस्त्यावरील पथविक्रेत्यांचे मात्र हाल झाले. शहरातील रस्ते आधीच खड्डेमय आहेत. त्यामध्ये पाण्याची डबकी तयार झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू

अकोले, श्रीगोंदे, पारनेर वगळता जिल्ह्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमीच आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास १७ हजार ७३७ क्युसेक्सने आवक सुरू होती. भंडारदरा धरणात ३३.५१ टक्के, निळवंडे धरणात १६.७५ टक्के मतदान टक्के उपयुक्त साठा आहे. मुळा धरणात मात्र केवळ ८.८४ उपयुक्त पाणीसाठा आहे.

पेरण्यांना वेग येणार

पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या दोन दिवस पाऊस सुरू असल्याने आता पेरण्यांना काही प्रमाणात वेग येईल. जिल्ह्यात खरीपाच्या आत्तापर्यंत २३.२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाची लागवड मात्र ५४ टक्क्यांवर गेली आहे. खरिपाच्या (एकूण उसासह) ६,७४,४६१ हेक्टरपैकी १ लाख ५६ हजार ५४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.