अहिल्यानगर: मालमत्ता धारकांना भाडेकरूंची कर आकारणी करू नये तसेच पाणीपट्टीमध्ये २५ टक्के कपात करावी अशी शिफारस करणारा ठराव नगरसेवकांच्या विरोधानंतर महापालिकेच्या आज, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला. सभापती सुभाष लोंढे यांनी ही माहिती दिली.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काल, समितीच्या सभेत आगामी वर्षाचे १७१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यावर समितीची पुन्हा आज सभा आयोजित करत सदस्यांनी तरतुदींवर चर्चा केली. नागरी प्रश्नावरूनही प्रशासनाला धारेवर धरले. सभेला विभागप्रमुख गैरहजर असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

मालमत्ता कराच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन चुकीचे मूल्यांकन केले, ३० ते ४० कोटी रुपये त्यांनी नागरिकांकडून गोळा केले, असा आरोप सभापती लोंढे यांनी केला. भाडेकरू नसताना अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. चुकीचे मूल्यांकन झाले आहे, करयोग्य मूल्याची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नाही, असे आक्षेप निखिल वारे, बाबासाहेब वाकळे, मनोज कोतकर आदींनी घेतला.

यावर स्पष्टीकरण देताना आयुक्त डांगे यांनी सांगितले की, शहरात मालमत्तांचे २२ वर्षानंतर मूल्यांकन झाले आहे. वाढीव मूल्यांकन करण्यात आले नाही तर केवळ ज्यांनी वाढीव बांधकामे केली आहेत त्यांनाच सुधारित कर आकारणी करण्यात आली आहे. क्षेत्रफळात वाढ झाली असेल तरच करांमध्ये वाढ झाली होईल. यापूर्वी ६५ कोटीपर्यंत कर वसुली होती, आता दुप्पट म्हणजे १५० कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. पाणीयोजनेसाठी दरमहा ५० कोटी रुपये खर्च येतो मात्र उत्पन्न केवळ १० कोटीच मिळते, तोट्याच्या परिस्थितीमुळे पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे.

महापालिका कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर १० कोटी रुपये खर्च करते, प्रत्यक्षात ते कामावर असतात का, त्यांची हजेरी नोंदवली जाते का, घरी बसून पगार घेतात का, याबद्दल सावळागोंधळ असल्याचा आरोप माजी महापौर वाकळे यांनी केला. कर्मचारी असूनही कामे होत नाहीत, त्यामुळे लोकप्रतिनिधी बदनाम होतात, आयुक्तांनी शिस्त निर्माण करावी अशी मागणी वाकळे व वारे यांनी केली. सभापती लोंढे यांनीही हलगर्जीपणा झाला तर कारवाई करा अशी सूचना केली.

अहिल्यादेवींचा पुतळा, महोत्सव, व्यसनमुक्ती केंद्र, निराधार केंद्राची मागणी

शहरातील पत्रकार चौकात असलेल्या वाहतूक शाखेच्या जागेत अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारावा, त्यासाठी वाहतूक शाखा स्थलांतरित करावी, पुतळ्यासाठी ५ कोटींची व अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवासाठी २५ लाखांची तरतूद करावी, पिंपळगाव माळवी येथील जागेत व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यासाठी तरतूद करा, शहरात ११ हजारांवर एकल महिला आहेत. या महिलांसाठी वसतिगृह बांधावे व एकल महिलांच्या १५ वर्षाखालील मुलांसाठी बालसंस्कार केंद्र सुरू करावे, ज्येष्ठ निराधार नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारावे, स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालय सुरू करावे, अंगणवाडी इमारती बांधण्यासाठी तरतूद करा, आदी मागण्यांचे निवेदन निखिल वारे यांनी सभापती लोंढे यांना दिले.

नगररचना विभागात दलाल

शहर बससेवा सुधारावी, बससेवा सुस्थितीत असावी, महिला व मुलींसाठी प्रवास सुरक्षित असावा तसेच नगररचना विभागाकडून विलंबाने परवानगी मिळतात, या विभागात दलालांचा सुळसुळाट झाला आहे, व्यवस्थेतील कर्मचारीच दलाल म्हणून काम करत आहेत, असा आरोप बाबासाहेब वाकळे व निखिल वारे यांनी केला. शहर बससेवा व नगररचना विभागातील कारभारासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली.