अहिल्यानगर: शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेने स्वच्छता नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील शहाजी रस्ता, नवी पेठ, घास गल्ली, तांबटकर गल्ली आणि गांधी मैदान परिसरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, उघड्यावर लघुशंका करणारे तसेच कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळणे याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरात महापालिकेकडून प्रथमच अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली. शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर कचरा जाळण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. एकूण सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच उघड्यावर कचरा जळणाऱ्याकडून २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य स्वच्छता निरीक्षक पी. व्ही. रामदिन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, प्रसाद बाळू उमाप, प्रशांत चांदणे तसेच मुकादम किशोर वैरागर, अमर वैराळ आणि ओंकार साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आयुक्त डांगे यांनी नागरिकांना शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व उघड्यावर लघुशंका करणे, उघड्यावर कचरा जाळणे टाळावे, अन्यथा अशा दंडात्मक कारवाया यापुढे अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील गुरु कार सजावट या दुकानदाराने उघड्यावरच दुकानातील कचरा जाळल्याने महापालिकेच्या पथकाने दुकानदारास २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. कुणी उघड्यावर कचरा जाळताना आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.

महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेमध्ये अतिक्रमण हटाव मोहीमही सुरू केली आहे. यामध्ये अनेक विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या, फलक हटवण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये महापालिकेने सातत्य ठेवावे अशी नागरिकांची मागणी आहे.

स्वच्छतेत नागरिकांची साथ हवी: आयुक्त

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे. कचरा घंटागाडीतच कचरा टाकावा. स्वच्छता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.