अहिल्यानगर: महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप यांच्या युतीने निर्विवाद सत्ता मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुकांची झुंबड असतांनाही नवख्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांत काहीसा नाराजीचा सुर आळवला जात आहे. आज, गुरुवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादीकडून विकास उर्फ विकी जगताप, रेवणनाथ पवार व बाबासाहेब नागरगोजे या तिघांची, भाजपकडून रवींद्र बारस्कर व विशाल नाकाडे या दोघांची, अशा पाच जणांची निवड करण्यात आली तर शिवसेनेच्या (शिंदे गट) एका, आदेश सुरेश जाधव या सदस्याची निवड कागदपत्रांच्या अपूर्ततेने रद्द करण्यात आली.
महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच सभेत, निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेल्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची निश्चित करून निवड जाहीर करण्यात आली व त्यांना तसे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटात गुलाल उधळत व नव्या नगरसेवकांच्या प्रतिमा झळकावत आनंदोत्सव साजरा केला.
मनपाच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजपच्या गटनेत्या शारदाताई ढवण व शिवसेनेचे गटनेते दत्ता कावरे यांनी त्यांच्या कोट्यानुसार नावे महापौर गाडे यांच्याकडे दिली. त्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी या नावांच्या प्रस्तावांच्या छाननीची प्रक्रिया केली व शिंदे सेनेच्या उमेदवाराची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त यशवंत डांगे यांनी हा अर्ज रद्द केल्याचे जाहीर केले.
सामाजिक कामाचा अनुभव
स्वीकृत सदस्यपदी नियुक्तीसाठी राज्य सरकारने निकष जाहीर केले आहेत. मात्र या निकषांपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या इच्छाशक्तीचे निकष सदस्य निवडीत प्रबळ ठरले. विकास उर्फ विकी जगताप (युवाशक्ती प्रतिष्ठान), रेवणनाथ पवार (उपनगर बुद्धीबळ सेवासंस्था), बाबासाहेब नागरगोजे (संत वामनभाऊ व भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान), रवींद्र बारस्कर (विचारधन चेस अॅकेडमी अँड स्पोर्टस् क्लब) व विशाल नाकाडे (महालक्ष्मी प्रतिष्ठान) या संस्थांच्या कामाचा अनुभव सादर केला आहे. शिवसेनेचे आदेश जाधव (नंदनवन सार्वजनिक वाचनालय) यांच्याकडील कागदपत्रांत अपत्य शपथपत्र तसेच स्थावर व जंगम मालमत्ता शपथपत्र प्रस्तावास जोडले नसल्याने त्यांचे नाव रद्द केले गेले. आता पुढील सभेत शिवसेना सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव घेतला जाणार का व त्यानुसार आदेश जाधव यांनाच हे पद मिळणार का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.
आयुक्तांचे दालन अत्याधुनिक, सभागृहाची दूरावस्था
महापालिका सभागृहाची अवस्था व सभागृहात सदस्यांवितरित अन्य व्यक्तींची उपस्थितीत यावरुन सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजपने प्रशासनाचे वाभाडे काढले. आयुक्तांचे दालन अद्ययावत करण्यात आले. परंतु सभागृहाची दूरावस्था तशीच आहे. नव्याने येणार्या नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही, वातानुकुलिन यंत्रण बंद, सभेला नगरसेवकांवितरित अन्य व्यक्तींची उपस्थिती यावरून निखिल वारे, संपत बारस्कर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तरीही नगरसेवकांच्या प्रश्नांना महापौर व प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांची कोंडीच झाल्याचे उघड झाले.
स्वीकृतही सव्वा वर्षांसाठी?
सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीने महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांची मुदत सव्वा-सव्वा वर्षासाठी केली आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने आज झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीही केवळ सव्वा वर्षांसाठी असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून याला दुजोरा दिला गेला तर भाजपने राष्ट्रवादीचा जो निर्णय झालाय, तोच आमचाही असेल, असे स्पष्ट करीत अप्रत्यक्षपणे स्वीकृत नगरसेवक सव्वा वर्षांसाठी असतील असे स्पष्ट केले.

