अहिल्यानगर: विधानमंडळ अंदाज समितीने महापालिकेच्या विविध प्रकल्पाच्या कामासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. विशेषतः सीना नदी व भिंगार नाला खोलीकरण – रुंदीकरण, घनकचरा व्यवस्थापन, फेज-२ व अमृत पाणी योजना या प्रकल्पांच्या कामाची विभागाच्या सचिवांकडे चौकशीची शिफारस केली जाणार आहे. समितीकडून तसे संकेत येथील दौऱ्यात देण्यात आले.
आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधानमंडळ अंदाज समिती गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी व तपासणीसाठी नगरच्या दौऱ्यावर आली होती. आज शनिवारी, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर समितीचे नगरमधील कामकाज आटोपले. त्यामुळे जवळपास सर्वच विभागांच्या प्रमुखांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
समितीचा दौरा गाजला तो बहुतांशी महापालिका संबंधित विषयांनी. पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी चुकीची आकडेवारी सादर केल्याने समितीने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल व आज असे दोन दिवस महापालिकेच्या कामकाजाची समितीच्या सदस्यांनी झाडाझडती घेतली. गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली फेज- २ पाणी योजना, अमृत पाणी योजना व भुयारी गटारी योजनेतील त्रुटींवर समितीने बोट ठेवले.
सीना नदीतून उपसलेला गाळ टाकला कोठे?
आज सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी २० कोटी तर भिंगार नावाच्या याच कामासाठी १३ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला, प्रत्यक्षात तेवढ्या रकमेचे काम झाले का, किती रुंदीकरण व खोलीकरणात किती गाळ निघाला, तो कोठे टाकण्यात आला? त्यासाठी किती दर आकारण्यात आला अशा विविध प्रश्नांची सरबत्ती महापालिके आयुक्त डांगे यांच्यावर करण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेत खोलीकरण व रुंदीकरणासाठी कमी दर असताना भिंगार नाला व सीना नदीसाठी प्रचंड दर कसा आकारला गेला. सीना नदीतून २ लाख मे. टन गाळ उपसला गेल्याची आकडेवारी सादर करण्यात आली. प्रत्यक्षात ते काम कुठे झाले, तो गाळ कुठे टाकण्यात आला? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
शहर इतके अस्वच्छ कसे?
शहरातील घनकचरा व्यवस्थापन, बुरुडगावचा कचरा डेपो, याबद्दल समितीच्या सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. रोज १४५ टन कचरा शहरात संकलन केल्याचे दाखवले जाते, मग शहरात इतकी अस्वच्छता का, शहराच्या प्रवेशद्वारांवरच कचऱ्याचे ढिगारे कसे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. सदस्यांनी मध्यरात्री बुरुडगाव कचरा डेपोची पाहणी केली. तेथील प्रक्रिया प्रकल्प बंद आढळले. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, असे समितीच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
सहभागी सदस्य
समितीचे एकूण २७ आमदार सदस्य आहेत मात्र पहिल्या दिवशी दौऱ्यात अवघे ७ सहभागी झाले, नंतर काल एकूण १६ आमदार सहभागी झाले. सदस्य काशिराम पावरा, कृष्णा खोपडे, बालाजी कल्याणकर, शेखर निकम, डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, सदाशिव खोत, हेमंत पाटील, सतीश चव्हाण, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी आणि नमिता मुंदडा, सुनील शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त यशवंत डांगे, विधानमंडळ सचिवालयाच्या अतिरिक्त सचिव सीमा तांबे आदी उपस्थित होते.
