अहिल्यानगर: महापालिका मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या शहरातील बाजारपेठांसह विविध भागातील १६९ गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. भाड्याची मोठी थकबाकी आणि मूळ गाळ्यांमध्ये केलेले अनधिकृत बदल यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास हे गाळे जप्त करून त्यांचे फेरलिलाव करण्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महापालिकेने शहरातील सर्व खुल्या जागा, व्यापारी संकुलांमधील गाळे, ओटे आणि शाळांच्या वर्गखोल्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अनेक गाळेधारकांनी महापालिकेची परवानगी न घेता मूळ गाळ्यामध्ये बेकायदेशीर बदल केल्याचे आढळले. दोन किंवा अधिक गाळे एकत्र करणे, स्लॅब फोडून अनधिकृत जिना काढणे, पुढील जागेचा हॉटेल व्यवसायासाठी बंदिस्त वापर करणे, गाळ्यांमध्ये वाढीव बांधकाम करणे, ‘टी-अँगल’ टाकून तळमजला व पहिल्या मजल्यावर बांधकाम करणे अशा व इतर स्वरूपाचे बेकायदेशीर व विनापरवाना बदल केले आहेत.

तसेच १६९ गाळेधारकांपैकी अनेकांकडे महापालिकेची सन २०२५-२६ अखेरची एकूण थकबाकी सुमारे ४ कोटी ३२ लाख रुपयांच्या घरात आहे. अनेक गाळेधारकांकडे लाखोंची थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेने रंगभवन शॉपिंग सेंटर, सावित्रीबाई फुले शॉपिंग सेंटर (फेज-१ व २), प्रोफेसर शॉपिंग सेंटर, गंगा उद्यान शॉपिंग सेंटर, वाडियापार्क शॉपिंग सेंटर, माळीवाडा शॉपिंग सेंटर, संत कैकाडी महाराज शॉपिंग सेंटर, जुना दाणे डबरा (खुली जागा आणि शॉपिंग सेंटर), ग्राहक भांडार (पश्चिम बाजू), सिद्धार्थनगर शॉपिंग सेंटर, अमरधाम शॉपिंग सेंटर आणि कंपाउंड लगतची जागा, जनरल पोस्ट शॉपिंग सेंटर, खजूरगल्ली शॉपिंग सेंटर, छाया टॉकीज शॉपिंग सेंटर आदी संकुलातील गाळेधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

थकबाकीदार गाळेधारकांनी १५ मार्चपूर्वी थकबाकी भरावी, फेरबदल करणाऱ्यांनीही त्यांना आकारलेल्या दंडाची रक्कम भरावी. अन्यथा गाळे जप्त करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सांगतानाच जप्ती कारवाईनंतर गाळ्यांचे लिलाव करण्यात येतील, असेही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान महापालिकेमध्ये २३० कोटी रुपयांचे असंतुलन निर्माण झाले आहे. ही विविध प्रकारची देणी महापालिकेने अद्याप दिलेली नाहीत. याशिवाय विविध भागातील सर्व गाळधारकांकडे एकुण ३०कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी निर्माण झालेली आहे. महापालिकेला आता आगामी अंदाजपत्रकाचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी जुळवाजुळव सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत या नोटिसा गाळेधारकांना पाठवल्या गेल्या आहेत. महापालिकेला दरमहा सुमारे साडेचार कोटी रुपये अधिक खर्च येतो. मात्र वसुली व त्या तुलनेत होणारा खर्च यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. शिवाय मालमत्ता व पाणीपट्टीकराची प्रचंड मोठी थकबाकीही निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीतून महापालिकेमध्ये आर्थिक असंतुलन निर्माण झाले आहे.