अहिल्यानगर: नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांकडील थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रथमच शास्तीमाफीचा (अभय योजना) निर्णय लागू करण्यात आला. मात्र या निर्णयाने जिल्ह्यातील १५ पालिकांच्या वसुलीमध्ये सरासरी एक टक्क्यापेक्षा (०.६१) कमी वाढ झाली आहे. केवळ श्रीगोंदा पालिका हद्दीतील नागरिकांना १०० टक्के तर इतर १४ पालिकांना ५० टक्केच सवलतीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे पंधरा पालिकांकडील घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण थकीत रक्कम ९३ कोटी ३३ लाखांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, जामखेड, शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर व नेवासा अशा एकूण १५ पालिका आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार या पालिकांची घरपट्टीची थकबाकी व चालू मागणी अशी एकूण ११० कोटी १६ लाख रुपयांची मागणी होती. त्यातील ६७ कोटी २९ लाख रुपये, म्हणजेच ६१.०९ टक्के वसुली झाली आहे.

या सर्व पालिकांची पाणीपट्टीची थकबाकी व चालू मागणी अशी ७४ कोटी ४६ लाख रुपये होती. त्यापैकी २४ कोटी १ लाख रुपयांची म्हणजे सरासरी ३२.२४ टक्के वसुली झाली आहे. शास्तीमाफी लागू केली असतानाही घरपट्टी वसुली सरासरी ६०.४८ टक्केच झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टीतील वसुली जवळपास दोन टक्क्यांहून अधिक घसरली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर ३४.५१ तर यंदा ३२.२४ टक्के वसुली झाली.

राज्य सरकारने गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावर शास्तीमाफी लागू करून कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबवली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी देण्याचे अधिकार देण्यात आले तर त्यापेक्षा अधिक शास्तीमाफी हवी असल्यास राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र हा निर्णय शासन आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंतच लागू करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने श्रीगोंदे व कोपरगाव या दोन पालिकांसाठी १०० टक्के शास्तीमाफी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यापैकी केवळ श्रीगोंदा पालिकेसाठीच १०० सवलतीला मंजुरी मिळाली. इतर सर्व म्हणजे १४ पालिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी ५० टक्यांची शास्तीमाफी लागू केली. या निर्णयामुळे श्रीगोंदे पालिकेच्या घरपट्टी वसुलीमध्ये केवळ ७ टक्केच वाढ झाली आहे. सवलत मिळूनही श्रीगोंदे पालिकेला वसुली वाढवता आलेली नाही. त्यातुलनेत ५० टक्के शास्तीमाफी मिळूनही पारनेर, अकोले, कर्जत, देवळाली प्रवरा, राहाता, शेवगाव या पालिकांची वसुली अधिक आहे.

नेवासा, कर्जत, पारनेर, देवळाली ८० टक्क्यांवर वसुली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १५ पालकांची मार्चअखेर‌ घरपट्टी थकबाकीची एकूण मागणी ११० कोटी १६ लाख रुपये होती. त्यातील ६७ कोटी २९ लाख रुपये वसुली झाली आहे. वसुलीचे पालिकांनिहाय प्रमाण पुढीलप्रमाणे – श्रीरामपूर ६२.९३ टक्के, संगमनेर ६३.८०, कोपरगाव ६८.९९, राहुरी ३०.५१, देवळाली प्रवरा ८३.६५, राहाता ७३.४५, पाथर्डी ६०.१३, श्रीगोंदे ६४.४६, शेवगाव ८०.३२, जामखेड २९.१५, शिर्डी ७०.२७, अकोले ८१.१९, कर्जत ८१.४४, पारनेर ७०.४६ व नेवासा ८७.४६. सरासरी ६०.०९ टक्के.