अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये महायुती निश्चित झाली असली तरीव त्यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चेच्या फेऱ्या होत आहेत, मात्र बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर करणे लांबवले जातात आहे.च उमेदवारीचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत, मंगळवारपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. महायुतीची यादी जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीची यादीही खोळंबली आहे.
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, रविवारी नगरमध्ये बोलताना शिवसेना महायुतीमध्ये येत असेल तर आनंदच आहे. त्याबाबत चर्चा चालू आहे, जागा वाटपाबाबतही चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान आज दुपारी शिवसेनेशी जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे अनिल शिंदे, संजय शेंडगे, सचिन जाधव यांच्यामध्ये चर्चा झाली. काल, शनिवारी रात्रीही लोणी येथे पालकमंत्री विखे व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. मात्र ७ जागांंबाबत वाद कायम आहे. या जागा भाजप व आमदार जगताप शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. रात्री उशिरा पुन्हा चर्चा होणार होती.
जागा वाटपाबाबत उद्या, सोमवारी मार्ग निघेल असे मंत्री विखे यांनी सांगितले आहे. महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही धक्कातंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत. महायुतीमध्ये विद्यमान नगरसेवकांची संख्याी अधिक आहे. त्याचबरोबर इच्छुकांची संख्याही अधिक आहे. बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर केली जाणार नाही, असा कयास व्यक्त केला जातो. दरम्यान उद्या, सोमवार व परवा, मंगळवार असे दोनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाकी आहेत. या दोन दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.
भाजप व राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. उमेदवारीही जवळपास निश्चित झाली आहे. मात्र शिवसेनेच्या काही जागांबाबत वाद आहेत. प्रभाग क्रमांक ९, १३ व १५ मधील जागा शिवसेनेला देण्यास भाजप व राष्ट्रवादी तयार नाही. याच तिढ्यावर दोन दिवसांपासून खलबते सुरू आहेत. चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. मात्र अद्याप मार्ग निघालेला नाही. चर्चा सुरूच ठेवण्यामागे बंडखोरी होऊ नये, असेही एक कारण सांगितले जात आहे.
ही …त्यामुळे महाविकास आघाडी ही खोळंबली
महायुतीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीची शक्यताही अधिक आहे. त्यातूनच महायुतीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतरच महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर करण्याचे धोरण आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीतील बंडखोर व नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकारी महायुतीचे जागावाटप केंव्हा जाहीर होते, त्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आघाडीसुद्धा धक्कातंत्र अवलंबण्याच्या मनस्थितीत आहे
कोतकर गट ‘लक्ष ठेवा’ भूमिकेत
केडगाव उपनगरात एकूण ८ जागा आहेत. या जागांवर कोतकर गटाने स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे. हा गट सुरुवातीला भाजपकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत होता. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कोतकर गट नंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात गेला. मात्र महायुतीचाच तिढा सुटत नसल्याने कोतकर गटाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. अजित पवार गटाचा कोतकर गटाला विरोध आहे. शेवटच्या क्षणी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे या गटाचे नेते भानुदास कोतकर लक्ष ठेवून आहेत.
निवडणुकीत नव्या-जुन्यांचा मेळ विखे
भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची, उमेदवारीमध्ये डावलले जात असल्याची तक्रार केली जात आहे, याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री विखे म्हणाले, निष्ठावंत आहे, म्हणून कोणाला डावलले जाते असे कधी होत नसते. निवडणुकीत नव्या-जुन्यांचा मेळ घालावाच लागतो. यादी जाहीर झाल्यानंतरच तुम्हाला समजेल की निष्ठावंतांना किती न्याय मिळाला आहे.
