अहिल्यानगर: अहिल्यानगर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार करण्यात आलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज, गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. मनपाचे एकुण १७ प्रभाग असून प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक २२ हजार २९५ मतदार तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक ३ मध्ये १४ हजार ८३० मतदार आहेत.
प्रभागनिहाय मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मतदार व तक्रारदाराकडून मागवण्यात आल्या असून मतदार व तक्रारदारांसाठी स्वतंत्र नमुना अर्ज दाखल करता येणार आहे. छायाचित्र विरहित मतदार याद्या नागरिकांना संकेत मनपाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी निशुल्क उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह प्रभाग समिती कार्यालयात हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.
शहर विधानसभेची मतदार यादी महापालिकेच्या प्रभागनुसार विभागून ती गामी निवडणुकीसाठी तयार करणे व अधिकार्यांनी अधिसूचित करणे या प्रयोजनासाठी १ जुलै २०२५ या आर्हता दिनांकानुसार यादी अधिसूचित करण्यात आली आहे. या आर्हता दिनांकास अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करून महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक करता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. असे करताना या मतदार यादीमध्ये मूळ विधानसभा मतदार यादीत नसलेली कोणतीही नावे समाविष्ट करण्याचे अथवा मूळ विधानसभा मतदार यादीत असलेली नावे वगळण्याचे तसेच त्यामध्ये कोणत्याही दुरुस्ती करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास किंवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादी करता प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास नाही.
प्रभाग १ ते १७ करता तयार करण्यात आलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीमध्ये काही हरकती व सूचना दाखल करायच्या असतील अशा मतदारांनी नमुना अ मध्ये व तक्रारदारांनी नमुना ब मध्ये (नमुना अ व नमुना ब मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे) विहित कालावधीत हरकती व सूचना दाखल कराण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही मनपाच्या प्रभाग मतदार यादीत नाव वगळले असल्यास ते समाविष्ट करणे, मृत व्यक्तीची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास अशा स्वरूपाच्या सुधारणा करता येणार आहेत.
छायाचित्रासहित प्रभाग क्रमांक २ ते १७ करता तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रति पृष्ठ २ रुपये प्रमाणे मनपा कार्यालयात विक्रीस उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
प्रभाग निहाय
प्रभाग निहाय मतदार संख्या (कंसात महिला):प्रभाग क्रमांक १- २२४९५ (११०२६), प्रभाग २-२२०९८ (१०२३०), प्रभाग ३- १४८३० (७२६२), प्रभाग ४- १९२५१ (९६०९), प्रभाग ५- १६३८० (८३३१), प्रभाग ६- १५८४० (७९२९), प्रभाग ७- १६५१६ (८२२७), प्रभाग ८- १८०२० (८५८६), प्रभाग ९- १८२५२ (९१४३), प्रभाग १०- २१५६६ (१०८११), प्रभाग ११- २०१६१ (९९३२), प्रभाग १२- १९८०९ (९८२६), प्रभाग १३- २५८४५ (७८९५), प्रभाग १४- १६६५४ (८१६३), प्रभाग १५- १५२४९ (७५२५), प्रभाग १६- १९६०६ (९४०७), प्रभाग १७- १५४३५ (७४७४). एकूण-३०७००९ (१५१३७५, व तृतीयपंथी १०८)
