अहिल्यानगर: विविध ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जतन करणाऱ्या अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्राने गणेशोत्सवानिमित्त सुमारे २०० गणेश मूर्तींचा संग्रह नगरकरांना पाहण्यासाठी खुला केला आहे. या गणेश मूर्तींसाठी खास दालन संग्रहालयात निर्माण करण्यात आले आहे. नवव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या कालखंडातील दुर्मिळ व मौल्यवान गणेश मूर्ती पाहण्यास उपलब्ध केल्या आहेत.
विविध धातूंपासून बनवलेल्या, हस्तिदंत, पोवळी, काष्ठ, संगमरवर, पाषाण, काच, कागदांचा लगदा, लाख, टेराकोटा अशा विविध माध्यमातून या गणेश मूर्ती साकार झालेल्या आहेत. विविध माध्यमातून विविध आकारातल्या या गणेश मूर्ती आहेत.
आठव्या शतकातील तांत्रिक गणपती ही दुर्मिळ मूर्ती तसेच जामखेडचे ज्येष्ठ संग्राहक पोपट हळपावत यांनी त्यांच्याकडील अनेक दुर्मिळ वस्तूंचा ठेवा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्त केलेला आहे. त्यामधील गणपती मूर्तींचा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. वस्तु संग्रहालयाचे दिवंगत कार्यकारी विश्वस्त सुरेश जोशी यांनीही अनेक गणेशमूर्ती प्रयत्नपूर्वक जमवल्या. त्याचाही दालनात समावेश आहे.
हळपावत यांच्या गणेश दालनात सर्वात लहान गणपती १.५ सेमी.चा आहे. हा नागबंद गणेश असून नागाचा विळखा गणेशाच्या पोटाला आहे तर सर्वात मोठा गणपती हा २३ सेमी आहे. हा अष्टभुजा गणेश आहे. याची सोंड डावीकडे असून सुबक मूर्ती साकारली आहे. शहाळ्यावर कोरलेला गणपती, हेही संग्रहाचे आणखी एक आकर्षण आहे. यात कोणतेही जोड काम नाही. काचेचा गणपती, लाकडी गणपती, सनई वाजवणारा, ढोल वाजवणारा, निद्रिस्त, मक्याच्या कणसामध्ये कोरलेला, सहा सोंडेचा अष्टभुजा गणपती, सुपारीमध्ये कोरलेला गणपती अशा आगळ्यावेगळ्या मूर्तीही दालनात आहेत.
तांत्रिक गणपती
आठव्या शतकातील तांत्रिक गणपती मूर्ती रुईछत्तीसी (ता. नगर) येथे आढळली. ही देशातील दुर्मिळ मूर्ती मानली जाते. दोन फूट बाय दीड फूट आकाराची एकपाषाणी मूर्ती आहे. दगडी चिऱ्यावर उठावाच्या पद्धतीने खोदलेले आहे. मूर्तीच्या पाठीशी पुन्हा एक आयात आकाराचा चौकोन काढला आहे. त्या भागावर मूर्तीचा जो प्रत्यक्ष भाग येतो तेवढाच भागावर श्री गणेशाचा प्रणवासहित (ओम सहित) बीज मंत्र कोरला आहे. उजव्या सोंडेच्या या मूर्तीची शरीर रचना अक्षर लिखित करावी लागल्याने मूर्तीचा आकार वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. मूर्तीच्या चारही हातात कोणतेही आयुध नाही. मूर्ती नग्न आहे. पायाशी छोटासा उंदीर आहे. महागणपती या तांत्रिक देवतेचा बीजावर ‘ओम गं’ असा आहे. तसेच तंत्र शास्त्रातील बिंदू, कला, नाद इत्यादी परिभाषिक सांकेतिक आकृतीही आहे. ग चा पहिला भाग हा उजव्या सोंडेचा असून त्याचा काना दोन्ही डावे हात मिळून झालेला आहे. या गणेशाचे सोळेवळे कडक असल्याने सामान्य लोक त्याची स्थापना करत नाहीत. मूर्तीचे तपशील वार वैशिष्ट्ये आद्य शंकराचार्यांच्या गणपती स्तोत्रात पहावयास मिळतात.
स्वतंत्र दालन
ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाकडे सुमारे २०० हून अधिक दुर्मिळ व मौल्यवान गणेश मूर्तींचा संग्रह आहे. गणेशोत्सवानिमित्त हा संग्रह नागरिकांना पाहण्यासाठी खुला आहे. या गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. भारतातल्या कोणत्याही संग्रहालयात इतका मोठा गणपती संग्रह नसेल तो नगरच्या संग्रहालयात आहे. गणपतींचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह एका स्वतंत्र दालनात ठेवण्यात आला आहे. तो सर्वांसाठी पाहायला खुला आहे. –डॉ. संतोष यादव, अभिरक्षक, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र, अहिल्यानगर
