अहिल्यानगर: टंचाईसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत आरक्षित ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुळा धरणावरील नगर शहरासह २२ पाणी योजनांसाठी शुक्रवारपासून (दि.१६) पासून १० टक्के पाणी कपात जलसंपदा विभागाने लागू केली आहे. मुळा धरण विभागाने या आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. त्याच्या प्रती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवल्या आहेत. मुळा जलसंपदा विभागाचा हा निर्णय नगर एमआयडीसीसह सुपा एमआयडीसी, साखर कारखान्याच्या पाणीयोजनांना शुक्रवारपासून लागू होणार आहे.

पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी व घरगुती पाणी वापर निश्चित करण्यासाठी धरणातील जलसाठे पिण्याच्या पाण्याच्या मापदंडानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत आरक्षित करण्याचे आदेश राज्य सरकारने ५ ऑक्टोबरला जारी केले आहेत. त्याच्या आदेशाची अंमलबजावणी जलसंपदा विभागाने सुरू केली आहे.

यामध्ये धरण जलाशयाचा उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा अतिरिक्त बफर किंवा आपत्कालीन साठा म्हणून राखून ठेवायचा आहे. हा बफर साठा अनपेक्षित पर्जन्यमानातील घट, दीर्घ कोरडा कालावधी वाढणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे. या साठ्याचा वापर सर्वसाधारण पाणी वापरासाठी करण्यात येणार नाही. केवळ पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठीच त्याचा वापर केला जाणार आहे.

मुळा धरणाची क्षमता २६ टीएमसी आहे. धरणात सध्या १८.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तो दहा टक्के राखीव ठेवून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवायचा आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मुळा पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता धनश्री शिंदे यांनी २२ पाणी योजनांच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून याची माहिती दिली आहे तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी धरण अभियंत्यांना नियंत्रण ठेवण्याची व दरमहा पाणी उचलण्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी टाकली आहे.

शहरातील वाहन धुण्याचे केंद्र मनपा बंद करणार

यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जलसंपदा विभागाचे पत्र अद्याप महापालिकेला मिळाले नसल्याचे सांगितले. मात्र राज्य सरकारच्या सूचनेनुसार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहर पाणीपुरवठ्यासाठी महापालिका रोज १०० एमएलडी पाणी उचलते. त्या तुलनेत १० टक्के पाणीकपातीचा परिणाम पाणीपुरवठावर होणार नाही. तरीही पाण्याची गळती रोखणे, नळांना तोट्या बसवणे, पाण्याची वेळ कमी करणे, वाहन धुण्याची केंद्र बंद करणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारदरा व निळवंडेकडून पत्र

मुळा पाटबंधारे विभागाने १० टक्के पाणीकपातीची जबाबदारी स्वतःकडे घेतली असली तरी निळवंडे व भंडारदरा धरण विभागाने ही जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. या संस्थांनीच दहा टक्के पुरवठ्यात कपात करावी असे सुचवले आहे. यासंदर्भात १७३ पाणीयोजनांच्या स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने, औद्योगिक संस्था आदींना पत्र पाठवून राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती कळवली असल्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.