अहिल्यानगर:औद्योगिक वापराच्या गॅसचा पुरवठा बंद पडल्याने अहिल्यानगर शहरालगतच्या नागापूर एमआयडीसीमधील सुमारे २५ टक्के उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले आहे. याचा थेट परिणाम सुमारे १५०० हजार कामगारांवर झाला आहे. गॅस पुरवठा सुरळीत रहावा यासाठी उद्योजकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
औद्योगिक वापराच्या गॅस पुरवठ्याचा प्रश्न युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणवू लागला असून त्यामुळे लघुउद्योजक अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे २०० ते २५० लघुउद्योजकांच्या कारखान्यातील उत्पादनावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना जयद्रथ खाकाळ म्हणाले, पावडर कोटिंग करणाऱ्या कंपन्या, इलेक्ट्रिक मोटर, अल्टरनेटर याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यातील उत्पादनातील विविध प्रक्रियांसाठी गॅसचा वापर आवश्यक असतो त्याशिवाय या प्रक्रिया होत नाहीत परंतु आता गॅस पुरवठा ठप्प झाल्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांच्या उत्पादनासाठी विविध प्रक्रियांसाठी औद्योगिक गॅसच्या वापराची आवश्यकता असते परंतु हा पुरवठा बंद पडल्याने उत्पादनच बंद झाले आहे.
नागापूर एमआयडीसीमध्ये सुमारे ९ ते १० हजार कामगार काम करतात त्यापैकी उत्पादन ठप्प झालेल्या कारखान्यातील संख्या दीड हजारावर असावी. उत्पादनासाठी तातडीने औद्योगिक गॅसचा वापर बंद करून अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब, जसे की डिझेल किंवा विजेवरील इंजिन भट्टी यासारख्या पर्यायी मार्गाचा अवलंब करणे शक्य नाही. कारण गॅस वापरावरील यंत्रणा कारखान्यातून उभारण्यात आलेली असते. पर्यायी यंत्रणा लगेचच उभारणी करणे शक्य नाही. तसे केल्यास उत्पादनाच्या खर्चात वाढ होऊन होणार आहे. ते लघुउद्योजकांना परवडणारे नाही.
विविध प्रक्रियांसाठी गॅसचा वापर
आमच्या ‘झेन इलेक्ट्रिकल्स’ या कारखान्यात इलेक्ट्रिकल मोटर व अल्टरनेटरचे उत्पादन केले जाते. उत्पादन प्रक्रियेमध्ये विविध टप्प्यांवर औद्योगिक वापराच्या गॅसचा उपयोग केला जातो. परंतु हा पुरवठा दोन दिवसांपासून न झाल्याने उत्पादन प्रक्रिया बंद पडली आहे. याचा थेट परिणाम सुमारे १०० कामगारांवर झाला आहे. -मिलिंद कुलकर्णी, उद्योजक
कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ
क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. प्लास्टिक उत्पादनासाठी क्रूड ऑइलचा वापर केला जातो. त्यामुळे प्लास्टिकच्या किमतीमध्ये १२० रुपयावरून १९० रुपये प्रति किलो अशी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र ‘जॉब वर्क’ करणाऱ्या कारखान्यांनी मोठ्या कंपन्यांशी पुरवठ्याचे करार पूर्वीच केले असल्याने त्यांना उत्पादन खर्च वाढला तरी जुन्याच दराने पुरवठा करावा लागणार आहे. याशिवाय विविध प्रकारच्या कच्च्या मालाच्या दरामध्येही मोठी वाढ झाली आहे. त्याचा भूर्दंड लघुउद्योजकांना सहन होणारा नाही. त्यातून उद्योजकांच्या ‘कॅश फ्लो’ वर परिणाम होणार असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
औद्योगिक वापराच्या गॅसचा पुरवठा बंद झाल्याने लघुउद्योजकांच्या व कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घेणार आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु वेळ मिळाली नाही. -जयद्रथ खकाळ, अध्यक्ष, आमी संघटना.
