अहिल्यानगर: नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. अमळनेर येथे पूर्ववैमनस्यातून केलेल्या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला. सोनई पोलिसांनी एकास अटक केली. मात्र मुख्य आरोपी पसार झाला आहे.

गोळीबारामध्ये गणेशवाडी येथील रोहित शिवाजी दरंदले (वय २०) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कैलास ज्ञानदेव दरंदले (रा. गणेशवाडी) यांनी सोनई पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना केली.

काही दिवसांपूर्वी अंमळनेर येथे दोन गटात रक्तरंजित हाणामाऱ्या घडल्या. याच कारणातून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रोहित दरंदले या युवकावर गोळीबार करण्यात आला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिक तपासासाठी पोलिसांनी प्रकाश बाळू भोसले (रा. निंभारी) याला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार आहे. त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.

नेवासा तालुक्यात नेवासा फाटा, सोनई, शनिशिंगणापूर परिसरात अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटना वाढलेल्या आहेत. महिन्यापूर्वीच किरकोळ वादातून एका तरणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. किरकोळ वादातून सर्रासपणे गावठी कट्ट्यांचा वापर केला जातो. हा परिसर गावठी कट्ट्यांच्या बेकायदा खरेदी-विक्रीसाठी म्हणूनही ओळखला जातो.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या वर्षात पोलिसांनी ५२ गावठी कट्टे हस्तगत करून २८६ आरोपी निष्पन्न केले आहेत तर जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ५७ गावठी कट्टे हस्तगत करून एकूण २२१ आरोपी निष्पन्न केले. जिल्ह्यातील बहुतांशी पकडलेले गावठी कट्टे हे मध्यप्रदेशांमधून आणले गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यामागे साखळी पद्धतीने खरेदी- विक्रीचे व्यवहार केले जातात. यातील आरोपींची संख्या लक्षात घेता, गावठी कट्ट्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या संख्येने तरुण असल्याचे आढळत आहे. मध्यप्रदेशमधून स्वस्तात गावठी कट्टे आणले जातात नंतर ते मध्यस्थामार्फत अधिक किमतीला विकले जातात. गावोगावच्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये गावठी कट्ट्यांचे आकर्षण वाढत आहे. परस्परांना धमकवण्यासाठी गावठी कट्ट्यांचा सर्रासपणे वापर केला जातो. वाळू तस्करांच्या टोळ्या गावठी कट्ट्यांचा वापर करतात.