अहिल्यानगर : दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त होऊन अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचे उर्वरित आयुष्य सुखकर व वेदनारहित करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘पॉलिएटीव्ह केअर’ योजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे ३ हजार ६०९ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ४६१ कर्करुग्ण आहेत. यासाठी आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात सर्वेक्षण केले होते.

‘पॉलीएटिव्ह केअर’ कार्यक्रम अंतर्गत रुग्णांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्हा सरकारी रुग्णालयात १० खाटा, ग्रामीण रुग्णालयात व उप रुग्णालयात २ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अशा अंथरुणाला खिळलेल्या व स्वतःची काळजी घेणे अशक्य असलेल्या रुग्णांना राज्य सरकार मोफत उपचार करणार आहे तसेच त्यांना समुदाय आरोग्याधिकारींमार्फत घरपोच उपचार केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली.

कर्करुग्ण, विकलांगता, हृदयरोग, वयोवृद्धपणामुळे, सांधेदुखी, दमा, मतिमंदता, मानसिक विकलांगता अशा विविध प्रकारच्या आजारांमध्ये, असाध्यतेमुळे रुग्णांना स्वतःची काळजी घेणे अशक्य होते. त्याचा कुटुंबावरही ताण पडतो. त्यामुळे अशा रुग्णांचे उर्वरित आयुष्य कमीतकमी वेदना असणारे व्हावे, यासाठी या योजनेद्वारे मोफत उपचार केले जाणार आहेत.

रुग्ण अंथरुणाला खिळून असला की त्याचा ताण कुटुंबावरही पडतो. रुग्णाच्या वेदनेचे व्यवस्थापन करून ते कमीतकमी वेदनादायी ठरावे, यासाठी घरपोच उपचार पद्धती पुरविली जाणार आहे. असे रुग्ण शोधण्यासाठी गेल्या महिन्यात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३ हजार ६०९ दुर्धर आजारग्रस्त रुग्ण आढळले. त्यामध्ये कर्करुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तोंडाचा कर्करोग झालेले २७६, स्तनाचा कर्करोग झालेल्या १०६ व गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या ७६ असे एकूण ४६१ कर्करुग्ण या सर्वेक्षणात आढळले आहेत.

अशा ३ हजार ६०९ रुग्णांमध्ये ३५६ तीव्र स्वरूपाचे, १ हजार ३४ मध्यम स्वरूपाचे तर २ हजार २१९ सौम्य स्वरूपाचे व्याधीग्रस्त आहेत. सौम्य व्याधीग्रस्तांकडे समुदाय आरोग्याधिकारी महिन्यातून एकदा, मध्यम स्वरूपाच्या व्याधीग्रस्तांकडे १५ दिवसातून एकदा तर तीव्र स्वरूपाच्या व्याधीग्रस्तांकडे दर आठवड्याला समुदाय आरोग्याधिकारी भेट देऊन तपासणी करणार आहेत.

आरोग्य विभागाशी संपर्क करा

‘पॉलीएटिव्ह केअर’ कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे. दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त अंथरुणाला खिळलेल्या असाह्य रुग्णांचे उर्वरित आयुष्य सुखकर व वेदनारहित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. अशा आजाराने ग्रस्त रुग्णांची माहिती आपल्या गावातील अशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्याधिकारी यांना देऊन त्यांच्यावर नियमित उपचार करून घ्यावेत. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद.