अहिल्यानगर:आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून प्रस्थान करणाऱ्या आणि मार्गक्रमण करत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी-पालख्यांच्या आगमनाने शहर गजबजून गेले आहे. ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ-मृदुंग-वीणेचा नाद, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, फुलांनी सजवलेला रथ अशा दिंड्या शहरातील प्रमुख रस्त्यावरून शिस्तीने जात आहेत. त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
वारकऱ्यांसह राज्य सरकारकडून मानाचे स्थान मिळालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज, पैठण येथील संत एकनाथ महाराज, जिल्ह्यातीलच असलेली संत निळोबाराय व ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांच्यासह लहान मोठ्या ३०० हून अधिक दिंडी-पालखी सोहळे नगरमार्गे पंढरपूरकडे जात असतात. या सोहळ्यातून लाखो वारकरी सहभागी असतात. शहरात आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांनी वारकऱ्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.
या दिंड्यांचे मार्गक्रमणाचे वेळापत्रक ठरलेले असते. शहर व परिसरात कोठे विसावा घ्यायचा, कोठे मुक्काम करायचा, याची आगाऊ माहिती संबंधित तरुण मंडळे, संस्था- संघटनांना असते. हे सर्वजण वारकऱ्यांची बाडदास्त ठेवतात. स्वागत मार्गावर कमानी उभारण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांवर फुलेही उधळली जात आहेत. दिंड्यांसमवेत असलेल्या प्रमुख, महाराजांचे कीर्तन व प्रवचन सोहळेही शहरात ठिकठिकाणी रंगू लागले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने उसंत दिल्याने मार्गक्रमण शिस्तीने होताना दिसत आहे.
दरवर्षी मार्गक्रमण करणाऱ्या या वारकऱ्यांचे व स्थानिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे ऋणानुबंध तयार झालेले आहेत. त्यांच्यामार्फत वारकऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था केली जाते. दिंड्यांच्या मुक्कामाचे विसाव्याचे ठिकाणही दरवर्षी ठरलेले असतात. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉक्टर संघटना, संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने चरण सेवाही केली जाते. अनेकजण स्वयंसेवी पद्धतीने वारकऱ्यांना मदत करतात. औषधोपचाराचीही व्यवस्था केली जाते.
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे काल, शनिवारी आगमन झाले. ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडीचे नेवासातून प्रस्थान करताना रिंगण सोहळा रंगला. पारनेरमधून संत निळोबाराय दिंडीचे दोन दिवसापूर्वी प्रस्थान झाले. शहरामार्गे जाणाऱ्या दिंड्या प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, पाथर्डी रस्त्याने नगरमध्ये येतात. मुक्काम, विसावा करून पुढे प्रस्थान करतात. अनेक लहान मोठ्या दिंड्या पुढील दोन-तीन दिवसाच्या कालावधीत मार्गस्थ होतील.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती
जिल्हा प्रशासनाने दिंड्यांच्या व्यवस्थेसाठी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा १५ जणांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय ४२ सहाय्यक नोडल अधिकारीसह महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अशा विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची पाणीपुरवठा, टॅंकर, निवास, वीज व्यवस्थेसाठी नियुक्त करण्यात आली आहे. पोलिसांनाही दिंड्यांच्या विसावा, मुक्कामी ठिकाणी चोऱ्या होऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी नियुक्त केले आहेत.
पालकमंत्री विखे यांच्या सूचना
पालकमंत्री राधाकृष्ण विखे दिंड्यांच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. विखे यांनी नगर व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद सांभाळलेले असल्याने नगरमार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाशी समन्वय साधून सूचना दिल्या. दिंडी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अंघोळीची व स्वच्छतागृहे, आरोग्य व सुरक्षा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दिंडी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. दिंड्यांच्या व्यवस्थेसाठी यंदा. ३ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
