अहिल्यानगर : दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पशुखाद्यातून प्रथिनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे ‘अल्कलोसिस’ (विषबाधासदृश्य) आजाराने अहिल्यानगर व पारनेर तालुक्यातील ३१ संकरित गाई दगावल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयोगशाळेत निष्पन्न झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. उमेश पाटील यांनी दिली.

अहिल्यानगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार व लगतच्या टाकळी खादगाव तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात गेल्या पंधरा दिवसातच लागोपाठ ३१ गाई अज्ञात आजाराने दगावल्या. यामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले. आमदार काशिनाथ दाते व राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली होती.

जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासणीत गाई दगावण्याचे कारण निष्पन्न होऊ शकले नाही. त्यामुळे दगावलेल्या गाईंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, मात्र त्यातही नेमके कारण आढळले नाही. त्यामुळे राज्य पातळीवरून क्रांतीसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ व पशुरोग अन्वेषण प्रयोग शाळेच्या पथकांनी नमुन्यांची तपासणी केली. त्यामध्ये गाईंना कोरडा चारा न देता दूध वाढवण्यासाठी दिल्या जात असलेल्या पशुखाद्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. त्यातून ‘अल्कोलोसिस’ (वीषबाधासदृष्य) आजाराने गाईंचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संकरित गाईंसाठी १६ ते २० टक्क्यांपर्यंत प्रथिने आवश्यक असतात. मात्र या घटनेमध्ये वापरल्या गेलेल्या पशुखाद्यामध्ये २४ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने होती. गायींना कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्याचा परिणाम होऊन ‘अल्कोलोसिस’ झाले व त्यातून गाईंचा मृत्यू झाल्याचे निदान प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये करण्यात आले आहे. दगावलेल्या ३१ पैकी ३० गाई या संकरित (होस्टन प्रिझन) आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पशुखाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी काहीवेळेस युरियाचाही वापर केला जातो. त्यातूनही ‘अल्कोलोसिस’ आजार होण्याचे प्रमाण वाढते, असे जाणकार सांगतात. दूध उत्पादनात अहिल्यानगर जिल्हा देशात अग्रेसर समजला जातो.

कोरडा चारा हवा

गाईंना संतुलित आहाराची आवश्यकता असते. अहिल्यानगर व पारनेर तालुक्यातील गाई दगावल्यांच्या घटनांमध्ये पशुखाद्यातील प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त आढळले व कोरडा चाराही दिला जात नव्हता. त्यातून ‘अल्कोलोसिस’ होऊन झालेल्या आजाराला गाई बळी पडल्या. आता शेतकऱ्यांना गाईंच्या आहारात कोरडाचाराचा घालण्याचा व मुरघास देतानाही त्याला बुरशी लागलेली नसेल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. – डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग.