अहिल्यानगर:सत्ताधारी महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पारनेर पदाधिकाऱ्यांमधील वादाचा चांगलाच भडका उडाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत व भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यामध्ये जाहीर कार्यक्रमातील खडाजंगी झाल्यानंतर आता कोरडे समर्थकांनी अशोक सावंत यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करत, पुतळा दहन केले. विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार काशिनाथ दाते यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा भडका उडाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पारनेरमधील देवीभोयरे येथील देवस्थानला ब दर्जा मिळाल्याच्या श्रेयवादातून दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादंग निर्माण झाले आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे सावंत व भाजपचे कोरडे यांच्यामध्ये आमदार दाते यांच्या उपस्थितीतच जाहीर कार्यक्रमात खडाजंगी झाली. त्याला आगामी जिल्हा परिषदेच्या कान्हूर पठार गटातील निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
खडाजंगीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आणि त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. आज, मंगळवारी कोरडे यांच्या बाभुळवाडे गावात, त्यांच्या समर्थकांनी अशोक सावंत यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन केले. देवीभोयरे येथील कार्यक्रमात कोरडे व सावंत यांच्यातील वाद बघून घेतो, पाहून घेतोपर्यंत गेला होता. आमदार दाते यांनी हस्तक्षेप करत हा वाद थांबवला होता.
सावंत यांनी यापूर्वीही पालकमंत्री विखे, माजी खासदार सुजय विखे, आमदार दाते यांच्या जाहीर कार्यक्रमात वेळोवेळी कोरडे यांच्यावर टीकाटिपणी केल्याचा कोरडे समर्थकांचा दावा आहे. बाबुळवाडे हे कोरडे यांचे गाव आहे. या गावातच पुतळा सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भविष्यात राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना समज न दिल्यास तालुक्यातील इतर गावांतही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान या वादाचे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी राजकीय भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. लंके हे पारनेरमधील भाजप व राष्ट्रवादी अशा दोघांचेही विरोधक आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या पारनेर दौऱ्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वादाला सुरुवात झाली. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींकडून याची कशी दखल घेतली जाते, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते.
