अहिल्यानगर: अहिल्यानगर व पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसात ३० गाईंचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने मृत्युमुखी पडलेल्या गाईंचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले, मात्र आजाराचेच निदान स्पष्ट झालेले नाही. दरम्यान आमदार काशिनाथ दाते व राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
दरम्यान आमदार दाते, पोपटराव पवार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावांना भेटी देत, तपासणी केली तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेतली. उपायुक्त डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार लागण झालेल्या गाईंवर उपचार तसेच लसीकरण करण्यात आले मात्र त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त झाले मात्र त्यामध्ये निदान स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचे पथक उद्या, रविवारी गाई दगावलेल्या गावांना भेटी देऊन तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार व टाकळी खादगाव तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ या परिसरात गेल्या दि. १३ पासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या गोठ्यातील ३० गाई दगावल्या. प्रथम दत्तात्रय बांगरे यांच्या गोठ्यातील गाय दगावली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले, मात्र त्यानंतर रोजच गाई दगावण्याच्या घटना होऊ लागल्या. आज, शनिवारी दोन गाई दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दैठणे गुंजाळमध्ये सुमारे १३००, हिवरे बाजारमध्ये १२०० व टाकळी खादगावमध्ये सुमारे ९०० अशा एकूण ३५०० हून अधिक गाईंची संख्या आहे.
लक्षणे
आजाराची लागण झालेल्या गाईंमध्ये सुरुवातीला रवंथ बंद होतो, नंतर तपमान कमी होते, गाय खाली बसते, एका कानावर झोपते व नंतर ती दगावते, असे लक्षणे आढळत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना चारा बदलण्याची गोठा स्वच्छ ठेवण्याची तसेच लसीकरणाची सूचना केल्याची त्यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- आमदार काशिनाथ दाते
गाय दगावलेल्या शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये त्यांच्या पाठीशी राज्य सरकार व प्रशासन आहे दगावलेल्या गाईन ची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे वरिष्ठ पातळीवरील तज्ञांचे पथक भेट देऊन आजाराचे निदान करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.
भरपाईची रक्कम वाढवा- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव योजना
सध्या जिल्हा परिषदेकडून केवळ १० हजार रुपये मदत मिळते, जी उपचारासाठीही अपुरी आहे. एका गायीची किंमत १ ते १.५ लाख रुपये असल्याने, शासनाने किमान ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी. आजाराचे तातडीने संशोधन होण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत तांत्रिक चाचणी व्हावी. केवळ बँक कर्ज असलेल्या जनावरांनाच विमा मिळतो, हा नियम बदलून सर्व जनावरांसाठी अल्पदरात विमा योजना सुरू करावी. तोपर्यंत दूध सोसायट्यांच्या पावत्या ग्राह्य धरून मदत द्यावी.
