अहिल्यानगर:कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून तसेच लेबल वर्णनाच्या उल्लंघनावरून येथील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नगरच्या एमआयडीसी मधील शीतगृहात ठेवलेले ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किंमतीचे ७५ हजार ३५६ किलो वजनाचे बटर (पाश्चराईड कुकिंग बटर-अनसोल्टेदड) धाड टाकून जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव जगताप (अन्न) यांनी या कारवाईची माहिती दिली. जप्त करण्यात आलेले बटर हा अन्न पदार्थाचा साठा पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीचा असल्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे संशयास्पद बटर पाटस (ता. दौंड) येथील मधुरमा क्रिमी डिलाईट या कंपनीने उत्पादित करून नगरच्या एमआयडीसीमधील ‘अरिहंत कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवलेले होते.

हे बटर कमी दर्जाचे व लेबल वर्णनाच्या उल्लंघनावरून (मुदत संपण्याची तारीख नाही) जप्त करण्यात आले आहे. जप्त साठ्यातून घेतलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक आयुक्त जगताप यांनी सांगितले. या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे, पी. पी. पवार, किरण जगदाळे, प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने सहभाग घेतला. काल, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास सुरू झालेली कारवाई आज, शुक्रवारी सकाळी संपली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने व सहआयुक्त एम. यु. माने (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आगामी काळ सणासुदीचा असल्यामुळे अहिल्यानगर शहरातील मिठाई व खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यावसायिकांनी कोणतेही कमी दर्जाचे अन्नपदार्थ व अस्वच्छ ठिकाणी तयार करण्यात आलेल्या अन्नपदार्थांची विक्री, साठा करू नये. बाहेरील राज्यातून कमी दर्जाचे अन्नपदार्थ ट्रॅव्हल्स व इतर वाहनातून अस्वच्छ ठिकाणी ठेवू व मागवू नयेत.

तसे आढळून आल्यास संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहाय्यक आयुक्त जगताप यांनी दिला आहे. सुमारे ४ कोटींचे बटर जप्त करण्यात आल्याने अन्नसुरक्षा विभागानेही केलेली कारवाई आजपर्यंतची सर्वात मोठी ठरण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने मिठाई उत्पादकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. उत्पादक कंपनी नगरच्या शीतगृहात बटर ठेवून तिथून महाराष्ट्रभर वितरण करत असल्याचाही अन्नसुरक्षा विभागाला संशय आहे.