अहिल्यानगर: सुमारे ५० फूट खोल व अवघ्या तीन फूट रुंद असलेल्या अत्यंत अरुंद विहिरीत पडलेल्या वृद्धाचा दोन दिवसानंतर अचानक शोध लागला. वृद्धाचा बंद पडलेला मोबाईल अचानक सुरू झाला आणि हा शोध लागला. पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील या घटनेत दैव बलवत्तर असल्याचे प्रचिती देणारी ही घटना घडली.

गावातील युवकांनी दोरखंडाच्या साह्याने विहिरीत उतरून वृद्धाला बाहेर काढले. या वृद्धाला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरख धनवटे असे या ६७ वर्षीय वृद्धाचे नाव आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा थरारक प्रसंग होता.

घरातील चुलीसाठी सरपण आणण्याच्या उद्देशाने गोरख धनवटे बुधवारी जवळच्याच एका पडक्या वाड्याकडे गेले. वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत व झुडपे वाढलेली असल्याने अरुंद असलेल्या विहिरीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे ते सुमारे ५० फूट खोल विहिरीत कोसळले.

विहीर केवळ तीन फूट रुंदीची आहे. सुदैवानेच विहिरीत फारसे पाणी नव्हते. विहिरीत पडल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु विहीर खोल व रुंद असल्याने त्यांचा बाहेर आवाज पोहोचला नाही. ते दिवसभर न घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. समाज माध्यमातून छायाचित्र व माहितीही प्रसारित केली. पाथर्डी पोलिसांकडे वृद्ध बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवण्यात आली.

विहिरीत पडलेल्या या वृद्धाचा काल, शुक्रवारी बंद पडलेला मोबाईल अचानक सुरू झाला. त्याने कुटुंबीयांना फोन करून आपण विहिरीत पडल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी जवळपासच्या विहिरीत शोध सुरू केला. नंतर जवळच्या पडक्या वाड्यात शोध घेतला. परंतु गवत व झुडपांमुळे विहिरीचा नेमका अंदाज येत नव्हता. बॅटरीच्या प्रकाश झोतात ते खाली पडल्याचे आढळले. कुटुंबीयांनी परिसरातील युवकांना मदतीसाठी बोलवले.

युवकांनी दोरखंडाच्या साह्याने धाडसाने विहिरीत उतरून त्यांना बाहेर काढले. अरुंद विहिरीमुळे त्यांचे हात पाय जखडले गेले होते. दुखापती झाल्या होत्या. दोन दिवस विहिरीत त्यांच्या अंगावरून दोनवेळा साप गेल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु सुदैवानेच ते बचावले. मिरी पोलीस चौकीतील अंमलदार संभाजी कुसळकर, खोत, भगवान टकले यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. वृद्धाची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जाते.