अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या संगमनेरमधील बैठकीवर भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महायुतीचे नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीच या बैठकीबद्दल आपल्याला कसलीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. विखे पिता-पुत्रांमध्ये गट पडलेले दिसतात, त्यामुळे प्रथम पालकमंत्री विखे यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे.
संगमनेरमधील बैठकीबाबत बोलताना एकसूत्रता न राहिल्याने सर्वांनी उठून अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच दोन दिवसातच ५४१ अर्ज नेले गेले आहेत. निर्णय सर्वमान्यतेने केला असता, सर्वांना विचारत घेऊन निर्णय झाला असता तर परिस्थिती नियंत्रणात ठेवता आली असती, असा टोलाही सभापती शिंदे यांनी लगावला. सभापती राम शिंदे म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे बैठक झाली. मात्र त्यास महायुतीचे नेते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्याला या बैठकीबाबत कसलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातही नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांना विचारात घेऊन बैठक झाली की न विचारताच झाली, असा प्रश्न मला पडला आहे.
संगमनेरमधील बैठकीला सुजय विखे होते. मात्र पालकमंत्री विखे नव्हते. त्यामुळे बैठकीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांना जर या बैठकीबद्दल माहिती नसेल तर महायुतीचे नेते, पदाधिकारी व आमच्यासारख्यांनी त्याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. म्हणूनच प्रचंड संख्येने अर्ज दिले जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय शिवसेनेने (शिंदे गट) स्वतंत्र बैठक घेतली आहे. पालकमंत्रीही मला या बैठकीबद्दल माहिती नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे मला सभापती म्हणून भूमिका घ्यावी लागते काय, असा प्रश्न पडला आहे, असेही राम शिंदे म्हणाले.
संगमनेरची बैठक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, विवेक कोल्हे यांचा आपल्याला दूरध्वनी आला होता. मात्र त्यानंतर कसली चर्चा झाली नाही, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या नेत्यांमध्येच स्पष्टता नसेल तर निवडणूक बिनविरोध होणार कशी? विखे पिता- पुत्रामध्येही दोन गट पडलेले दिसतात, असाही टोला राम शिंदे यांनी लगावला. दरम्यान सभापती राम शिंदे यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही मतदारसंघातून आज, बुधवारी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले. या दोन्ही मतदारसंघातून आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
