अहिल्यानगर: सुमारे ८०० वर्षाहून अधिक प्राचीन व संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई यांच्या स्पर्शाने पवित्र झाल्याची आख्यायिका असलेली ‘मुक्ताई बारवे’चे सेवावर्धिनी संस्थेने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनर्जीवन व पुनर्वापर प्रकल्पां’तर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुनरुज्जीवन केले आहे. अशा या बारवेचे उद्या, बुधवारी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
पिचडगाव (ता. नेवासा, अहिल्यानगर) येथे ही प्राचीन बारव आहे. पुणेस्थित सेवावर्धिनी या संस्थेने महाराष्ट्रासह कर्नाटकमधील आत्तापर्यंत २६ ऐतिहासिक व प्राचिन बारवांचे पुनरुज्जीवन केले आहे. पिचडगाव ग्रामपंचायतच्या जागेत ही मुक्ताई बारव आहे. ही विजया बारव म्हणजे चारी बाजूंनी पायऱ्या असलेली वैशिष्ट्यपूर्ण आहे. बारव पुरातन असली तरी तिचे नैसर्गिक जलस्रोत अद्याप कायम आहेत. आजूबाजूला कुपनलिका किंवा विहिरी खोदल्या गेल्या तरी या बारवेचे जलस्रोत कमी झालेले नाही. राज्याच्या पुरातत्व विभागाने ही बारव संरक्षित केलेली आहे.
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई ही भावंडे पैठणहून नेवासाकडे जाताना या बारवजवळ थांबले. त्यावेळी या बारवचे पाणी विषारी मानले जात होते. मुक्ताईंनी ते पाणी प्राशन केल्यानंतर शुद्ध झाल्याची आख्यायिका परिसरात सांगितले जाते. त्यामुळेच या बारवला ‘मुक्ताई बारव’ असे नाव प्राप्त झाले आहे.
सेवावर्धिनी संस्थेने दोन वर्षांपूर्वी मुक्ताई बारवच्या पुनर्जीवनाचे काम सुरू केले. त्यावेळी बारवमध्ये झाडेझुडपे वाढलेली होती, काही प्रमाणात ढासळली होती. ढासळलेले दगड, परिसरातील दगड घडवून तसेच राजस्थानमधून दगड आणून या बारवचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्यासाठी सेवावर्धिनीने कंपन्यांच्या सीएसआर निधीतून हातभार लावला तसेच ग्रामस्थांनीही श्रमदान केले. मुक्ताई बारवच्या संवर्धनासाठी सुमारे ८० लाख रुपये खर्च आल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
बारव संवर्धनाची पहिली कार्यशाळा
सातवाहन काळापासून बारवांची निर्मिती सुरू झाल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात अनेक बारव आहेत. बारवांचे जलसंवर्धनातील, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बारव संवर्धन समिती’ स्थापन केली आहे. सांस्कृतिक कार्य विभाग व सेवावर्धिनी संस्था यांच्या वतीने बारव संवर्धनाची पहिली कार्यशाळा उद्या मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माळी चिंचोरे (ता. नेवासा) येथे होत आहे. समितीचे सदस्य तसेच विविध विभागांचे प्रमुख या कार्यशाळेत उपस्थित राहणार आहेत. प्राचीन ऐतिहासिक बारवांचा शोध घेणे, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल याविषयी ऊहापोह कार्यशाळेत केला जाणार आहे.

आत्तापर्यंत २६ बारवांचे पुनरुज्जीवन
सेवावर्धिनी संस्था गेल्या २८ वर्षांपासून जलसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांना सेवावर्धिनी विविध प्रकारचे मार्गदर्शन करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त संस्थेने त्यांना मानवंदना देण्यासाठी राज्यातील १०० बारवांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. आत्तापर्यंत सातारा, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील २६ बारवांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील गावांची तहान भागवली जाते, नैसर्गिक जलस्रोत जिवंत राहून जलसंवर्धन होते तसेच बारवांचे महत्त्वही लक्षात राहते. -गिरीश देगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवावर्धिनी
