अहिल्यानगर : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदांसाठी शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज, बुधवारपासून मैदानी व शारीरिक चाचण्यांनी सुरुवात करण्यात आली.
यंदाच्या भरती प्रक्रियेत प्रथमच १००, ८०० व १६०० मीटर धावण्याच्या शर्यतींसाठी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वापरल्या जाणार्या स्वयंचलित कॅमेरा प्रणाली तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे धावपटूंमधील अत्यंत कमी फरक अचूकपणे नोंदवता येणार आहे. त्यातून पारदर्शकता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केला.
पहिल्याच दिवशी ८०१ उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. पैकी ५५० उमेदवार उपस्थित तर २५१ गैरहजर राहिले. उपस्थितांच्या प्राथमिक शारीरिक निकषांमध्ये ४७ उमेदवार अपात्र तर ५०३ उमेदवार पात्र ठरले. पात्र उमेदवारांची १०० मी. व १६०० मी. धावणे तसेच गोळाफेक चाचणी घेण्यात आली.
या भरती प्रक्रियेत ७३ पदांसाठी एकूण ४ हजार १४८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये ८१२ महिला व ३ हजार ३३६ पुरूष उमेदवारांचा समावेश आहे. उच्चशिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. १४ फेब्रुवारीपर्यंत मैदानी व शारीरिक चाचणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उद्या, गुरूवार व परवा शुक्रवारी प्रत्येकी १२०० उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १४) महिला उमेदवारांची चाचणी होईल.
पोलीस अधीक्षक घार्गे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. भरती प्रक्रियेवरील नियंत्रणासाठी राखण्यासाठी सुमारे ४५० अधिकारी, कर्मचारी व लिपिक तैनात करण्यात आले आहेत.
निवास व्यवस्था
भरतीसाठी जिल्ह्याबाहेरून येणार्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस मुख्यालयातील मंगल कार्यालयात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्यत्र निवासाची सुविधा उपलब्ध नसल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष किंवा मुख्यालयाशी संपर्क साधावा, त्यांना तत्काळ निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.
उमेदवारांवर लक्ष
भरती प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यालय परिसरात उमेदवारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी उत्तेजक द्रव्य किंवा प्रतिबंधित औषधांचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधीक्षक घार्गे यांनी दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बंदोबस्त व उमेदवारांसाठी करण्यात आलेल्या सुविधांमुळे भरती प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.
