अहिल्यानगर: ‘गुगल मॅप’चा वापर करत महावितरणच्या वीज उपकेंद्रात चोरी करणारी मध्यप्रदेशातील टोळी अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे तांबे व एक स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशातील ही टोळी केवळ तांबे (कॉपर) चोरीसाठी महाराष्ट्रात येत होती, असेही तपासात पोलिसांच्या तपासात आढळले आहे.
बबलू उर्फ हुसेन रेहमत खान (वय ३८, या. कडमेडी, समशाबाद, विदिशा, मध्यप्रदेश), जमीन कमरअली खान (वय ३२), शकील लईस खान (वय, ३२, ग्रामभरोसा, बेरसिया, भोपाळ, मध्यप्रदेश), कासिम इद्रीस खान (वय ३०, महाराजखेडी, सिरोज, विदिशा, मध्यप्रदेश) व शाहरुख साबीर खान (वय २४, जिनीया, भोपाळ, मध्यप्रदेश) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अहिल्यानगरसह नाशिक ग्रामीण व पुणे ग्रामीण जिल्ह्यात ६ ठिकाणी चोऱ्या केल्याचे पोलीस तपासात आढळल्याची माहिती निरीक्षक कबाडी यांनी दिली. यातील चार चोऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, शेवगाव, नेवासा तालुक्यात केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या टोळीच्या कार्यपद्धतीची माहिती देताना निरीक्षक कबाडी यांनी सांगितले की, ही टोळी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आल्यानंतर ‘गुगल मॅप’वर महावितरणचे वीज उपकेंद्र कोठे आहे, याची माहिती घेत असे. नंतर उपकेंद्राच्या परिसरात दोन दिवस पाहणी करून येणे-जाण्याचे रस्ते माहिती करून घेत असे. त्यानंतर रात्री व पहाटेच्या दरम्यान चोरी करत असे. केवळ कॉपर तारेची चोरीसाठीच ते महाराष्ट्रात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुगल मॅपचा वापर करत या टोळीने खांडके (ता. नगर) येथील वीज उपकेंद्र तसेच २२० केव्ही क्षमतेचे कौडगाव येथील तसेच विंड वर्ल्ड कंपनीचे शेवगाव, नेवासा, सिन्नर, पारगाव (नाशिक येथील उपकेंद्रातून ‘गुगल मॅप लोकेशन’च्या आधारे कॉपर चोरी केल्याचे कबुली दिली आहे.
या टोळीविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांकडे ही टोळी सुपूर्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, विष्णू भागवत, फुरकान शेख, भीमराज खडसे, राहुल डोके, अमोल आजबे, जालिंदर माने, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकाने या टोळीचा छडा लावला.
