अहिल्यानगर: कर्णकर्कश्श ध्वनीवर्धकांचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शहर पोलिसांनी ३७ मंगल कार्यालयांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत. दोन्ही प्रदूषणाबाबत यापुढे कठोर भूमिका घेतली जाईल असे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी सांगितले.
ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनीप्रदूषण (विनिमय व नियंत्रण) अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार या नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये ध्वनी यंत्रणांच्या चालक-मालकांचाही समावेश आहे.
शहर व परिसरात कोठेही ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करून डीजेवर, डॉल्बी सिस्टीमद्वारे कर्णकर्कश्श आवाज केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
शहरासह उपनगरांच्या मध्यवर्ती भागात अनेक मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांमधून कर्णकर्कश्श आवाजात ध्वनिक्षेपक वाजवले जातात. केवळ मंगल कार्यालयातच नाही तर धार्मिक स्थळावरूनही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटना घडतात. शहरातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालये, धार्मिक स्थळे यांच्या परिसरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरोधात या नोटीस बजावण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी टिप्परसे यांनी सांगितले.
या नोटिसांमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार रात्री १० नंतर ध्वनीवर्धकावर बंदी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी खाजगी समारंभ होतात, वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, भररस्त्यात ध्वनीक्षेपक लावून वाढदिवस साजरे करण्याच्या घटना घडतात. मात्र दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. नागरिकांनी तक्रार करावी त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
पोलिसांनी केवळ ध्वनीप्रदूषण कायद्याबाबतच नव्हे तर मंगल कार्यालया पुढे लावण्यात येणाऱ्या अस्ताव्यस्त वाहनांनाही शिस्त लावावी अशी नागरिकांची मागणी आहे. मंगल कार्यालया पुढे अनेकदा रस्ते अडवून वाहने लावले जातात. शहरातून निघणाऱ्या वरातींमुळेही वाहतुक कोंडीच्या घटना घडतात. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, अशाच वेळी त्या भागातून वरात निघाल्यास वाहतुकीची मोठीच कोंडी होते. विवाह समारंभाच्या वरातींमधून कर्णकर्कश्श आवाजाच्या उल्लंघन करणाऱ्या घटना सर्रासपणे घडतात. पोलिसांच्या भूमिकेमुळे याला प्रतिबंध बसेल असेशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नमुने घेतले
शहरातील विविध मंगल कार्यालयांच्या परिसरात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. त्यानुसार या प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यापुढे ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. – डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी.
